नागपूर : लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले आहेत. चौकशी समितीनेही त्यांना दोषी ठरवले असताना त्यांना क्लिनचिट देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी त्यांनी केलीय.
पटोले म्हणाले की, लोकप्रतिनिधी, पत्रकार व अधिकारी यांची वेगळी नावे ठेवून त्यांचे फोन टॅप केले गेले. हा आमच्या व्यक्तीस्वातंत्र्यांवरचा घाला आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना त्यांनी ब्लॅकमेलिंगची व्यवस्था केली होती. महाविकास आघाडीचे सरकार असताना रश्मी शुक्ला या आयपीएस अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाले, त्यांची चौकशी झाली, रश्मी शुक्ला यांनी चूक झाल्याचेही मान्य केले होते. पण राज्यात ईडीचे सरकार येताच फोन टॅपिंग प्रकरण दडपण्याचे काम केले जात आहे.
पुणे पोलिसांनी न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला. पण कोर्टाने ताशेरे ओढत अधिक चौकशीची गरज असल्याचे सांगितले. फोन टॅपिंग गंभीर गुन्हा असताना सरकार या गुन्हेगारांना पाठीशी का घालत आहे? फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी क्लिनचिट देण्याचा सपाटाच लावला होता. आताही तोच प्रकार सुरू आहे. सभागृहात आज आम्ही नियम ५७ अन्वये फोन टॅपिंग प्रकरणी चर्चा करण्याची मागणी केली परंतु अध्यक्ष महोदयांनी आम्हाला बोलू दिले नाही, असे नाना पटोले यांनी सांगितले.
एकतर्फी कामकाज सुरू आहे. सभागृहाच्या सदस्याला संरक्षण देण्याचे काम अध्यक्षांचे आहे. परंतु आमच्या अधिकारांचे रक्षणही केले जात नाही. अध्यक्षांनी पक्षपातीपणे वागू नये, नियमांनी सभागृह चालवण्याची त्यांच्यावर जबाबदारी असते पण त्यांनी आम्हाला बोलू दिले नाही म्हणून आम्ही सभात्याग केला आहे. अध्यक्ष जर असेच पक्षपाती वागत राहिले. तर त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याचा विचार आम्ही करू, असेही पटोले म्हणाले.