कुणाच्या शिव्यांनी फरक पडत नाही, मला विष प्यायची सवय; फडणवीसांकडून विरोधकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार; पराभवाच्या भीतीपोटी विरोधक निराधार आरोप करत आहेत. 'अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ…'
Chief Minister Fadnavis’ reply to the opposition : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बिनविरोध निवडींचा मुद्दा तापलेला असतानाच, प्रचाराच्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट आरोप-प्रत्यारोपांची फैरी जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ‘मागील पानांची’ आठवण करून दिली जात असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.
बिनविरोध निवडींच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक संदर्भ देत विरोधकांवर दुहेरी निकषांचा आरोप केला. देशाच्या संसदीय इतिहासात आतापर्यंत 35 खासदार बिनविरोध निवडून आले असून, त्यापैकी तब्बल 33 खासदार काँग्रेसच्या काळातील असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘काँग्रेसचे खासदार बिनविरोध निवडून आले, तेव्हा लोकशाही जिवंत होती; पण धुळ्यात भाजपचे चार नगरसेवक बिनविरोध निवडून आले तर लोकशाहीचा खून झाला, असे म्हणणाऱ्यांचे डोके नेमके कुठे आहे?’ असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला.
पांझरा काठी येथे झालेल्या सभेत फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांवर जोरदार टीका केली. निवडणूक आयोग भाजपच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाकडून केला जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, पराभवाच्या भीतीपोटी विरोधक निराधार आरोप करत आहेत. ‘अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूँ…’ या गाण्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांच्या टीकेची खिल्ली उडवली.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आज होणार घोषणा? राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात
दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘कुणी कितीही शिव्या दिल्या तरी मला त्याचा फरक पडत नाही. मला विष प्यायची सवय आहे. सपकाळ यांना त्यांच्या पक्षात, जिल्ह्यात किंवा तालुक्यातही कोणी गंभीरतेने घेत नाही. केवळ मला शिव्या दिल्यामुळे ते माध्यमांत दिसतात.
दरम्यान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्यावर यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, ‘महायुती म्हणून आम्ही राज्यात आणि केंद्रात एकत्र आहोत; मात्र महापालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढत आहोत. त्यामुळे चर्चा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारापुरतीच असली पाहिजे. मी फक्त पालिकेच्या कारभाराबाबतच बोललो असून त्याचे पुरावे दिले आहेत.’
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात स्थानिक प्रश्नांपेक्षा राजकीय टोलेबाजी आणि आरोप–प्रत्यारोप अधिक तीव्र होत असल्याचे चित्र सध्या राज्यभरात पाहायला मिळत आहे.
