भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला धोबीपछाड; अंबरनाथ नगरपालिकेत काँग्रेस आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती
भाजपकडून काँग्रेस व अजित पवारांची राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत 'अंबरनाथ विकास आघाडी'ची स्थापना; शिंदेंची शिवसेना सत्तापासून दूर.
Alliance with Congress and Ajit Pawar’s NCP in Ambernath Municipality : अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपने नगराध्यक्षपद मिळवल्यानंतर आता सत्तेची पकड मजबूत करत भाजपने काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली आहे. या आघाडीची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली असून, या घडामोडींमुळे सर्वाधिक 27 नगरसेवक असलेली शिंदेंची शिवसेना सत्तेपासून बाहेर राहिली आहे.
या नव्या आघाडीत भाजपचे 14, काँग्रेसचे 12, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे चार आणि एक अपक्ष असा एकूण 31 नगरसेवकांचा समावेश आहे. नगराध्यक्षांसह ही संख्या 32 वर पोहोचते. पालिकेत भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त कारभार करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याचा दावा भाजपने केला आहे. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या राजकीय हालचालींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
आठवणी लिहलेल्या पुसता येतात पण…, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा अभिनेता रितेशकडून समाचार
निकालानंतरचे राजकीय गणित
निवडणुकीनंतर शिंदेंची शिवसेना हा सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. मात्र, नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मारली. त्यानंतर भाजपने शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ता स्थापन न करता स्वतंत्र भूमिका घेत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. भाजपने भ्रष्टाचारविरोधी आणि भयमुक्त प्रशासनाचा मुद्दा पुढे करत शिंदेंच्या शिवसेनेपासून अंतर राखण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.
शरद पवार साहेबांचं नेतृत्व दूरदृष्टीचं; अजित पवारांचं वक्तव्य, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार?
स्थानिक विरोध आणि नव्या आघाडीचे फायदे
शिंदेंच्या शिवसेनेतील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांना भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने उघड विरोध दर्शविल्याचेही या निर्णयामागचे कारण मानले जात आहे. काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांनीही शिंदेंच्या शिवसेनेकडे न जाता भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नव्या आघाडीच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांची संख्या अधिक येणार असून, विविध समित्यांवरही या आघाडीचे वर्चस्व राहणार आहे.
प्रतिक्रिया
शिंदेंच्या शिवसेनेकडून या घडामोडींवर तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ‘शिवसेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे. स्थानिक पातळीवरही ही युती होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने काँग्रेससोबत अभद्र युती केली,’ अशी टीका आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केली.
भाजपकडून मात्र निर्णयाचे समर्थन करण्यात आले आहे. ‘अंबरनाथमध्ये आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवली असून, भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त शहरासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यामुळेच अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केली आहे,’ असे भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसकडूनही सकारात्मक भूमिका मांडण्यात आली असून ‘शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या उद्देशाने स्थानिक पातळीवर आम्ही एकत्र आलो आहोत. द्वेषाचे राजकारण बाजूला ठेवून शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू,’ असे काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी सांगितले.
