जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आज होणार घोषणा? राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत.

  • Written By: Published:
Untitled Design (214)

Zilla Parishad and Panchayat Samiti elections : महाराष्ट्रात सध्या 29 महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून, 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहेत. या निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच फेब्रुवारी महिन्यात राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याबाबत राज्य निवडणूक आयोग लवकरच मोठी घोषणा करणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

महापालिका निवडणुका पार पडताच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनुसार, या निवडणुकांसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मतदान होऊ शकते.

राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत. मात्र, यामधील 17 जिल्हा परिषदा आणि 88 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने, या संस्थांमध्ये सध्या निवडणुका घेता येणार नाहीत. त्यामुळे आरक्षणाच्या मर्यादेत बसणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका या टप्प्यात घेण्यात येणार असल्याची माहिती आहे. त्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाकडून तयारी अंतिम टप्प्यात आहे.

शरद पवार साहेबांचं नेतृत्व दूरदृष्टीचं; अजित पवारांचं वक्तव्य, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार?

महत्त्वाचे म्हणजे, 7 जानेवारी रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 31 जानेवारीपर्यंतची डेडलाईन सुप्रीम कोर्टाने निश्चित करून दिली आहे. त्यामुळे आयोगावर वेळेचे बंधन असून, निवडणूक प्रक्रियेचा वेग वाढवण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, महापालिका निवडणुकांचे निकाल हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी ‘सेमीफायनल’ ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. महापालिकांतील कामगिरीवरूनच पक्षांची ग्रामीण भागातील रणनीती ठरणार असून, सत्ताधारी व विरोधकांसाठी पुढील काही आठवडे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे निवडणुकांचा महाकुंभ पाहायला मिळणार, हे मात्र नक्की.

follow us