Sunil Tingre Notice To Sharad Pawar : ऐन विधानसभा निवडणुकीत सुनिल टिंगरे (Sunil Tingre) चौफेर टीकेचे लक्ष्य झाले आहे. टिंगरे यांच्या नोटीस प्रकरणामुळे वडगाव शेरीत मोठा राजकीय धुराळा उडालाय. पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आमदार सुनिल टिंगरे हे टिकेचे लक्ष्य बनलेले होते. आता पुन्हा एकदा आमदार सुनील टिंगरे हे टीका करणाऱ्या नेत्यांना बदनामीच्या कायदेशीर नोटीसा पाठविण्याच्या कृतीने पुन्हा टीकेचे धनी बनले आहेत. वडगाव शेरी (Vadgaon Sheri) विधानसभा मतदार संघातील जाहीर सभांमधून नोटीस प्रकरणाने राजकीय धुराळा उडाला आहे.
खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 8 नोव्हेंबर रोजी येरवडा येथे जाहीर सभेत (Assembly Election 2024) या विषयाला तोंड फोडले.’पोर्शे कार अपघात प्रकरणी टीका केल्यास कायदेशीर कारवाई करू, अशी नोटीस शरद पवार यांना आली आहे. पवार साहेब ईडीच्या नोटीसांना घाबरले नाहीत ते तुझ्या नोटीसला घाबरतील का?’ अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आमदार सुनील टिंगरे यांना ललकारले होते. त्यानंतर नोटीस प्रकरण हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दाच बनला.
शरद पवार (Sharad Pawar) यांना कायदेशीर नोटीस ही बातमी राष्ट्रीय वृत्तपत्रात, वाहिन्यांवर गाजली. टिंगरे यांचा खुलासाही झळकला. मात्र, ते बचावात्मक पवित्र्यात दिसले. शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना ही नोटीस टिंगरे यांनी वकिलामार्फत पाठवल्या आहेत. सुप्रिया सुळे, सुरेंद्र पठारे हे विविध माध्यमातून पोर्शे कार प्रकरणात टीका करीत असल्याचा उल्लेख याच नोटिशीमध्ये टिंगरे यांनी केलाय.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वडगाव शेरीतील कार्यकर्त्यांनी या नोटीसा माध्यमांना उपलब्ध करून दिल्यावर टिंगरे हे पुन्हा टिकेचे धनी बनले आहेत. तसेच पोर्शे प्रकरणाचा पुन्हा धुराळा उडालाय. दुसरीकडे पोलीस तपास, चौकशीच्या बातम्याही माध्यमातून झळकत असून प्रचाराचे इतर मुद्दे किमान पुणे आणि वडगाव शेरीत मागे पडल्याचे दिसत आहे. शरद पवार यांच्या पक्षाचे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील उमेदवार बापूसाहेब टिंगरे यांच्या पथ्थ्यावर ही परिस्थिती पडली आहे. त्यांचे कार्यकर्ते आक्रमकपणे हा मुद्दा उचलताना दिसत आहेत.