Download App

सोलापूर लोकसभा : वर्तुळ पूर्ण करण्यासाठी प्रणिती शिंदे सज्ज, भाजपची शोधमोहिम पुन्हा सुरु!

अभेद्य गड, बालेकिल्ला म्हणजे तरी काय? तर कधीही सर न होणारा, कधीही काबिज न करता येणारा, कितीही डावपेच रचले तरी शत्रुच्या हाती न लागणारा किल्ला. कधी काळी सोलापूर लोकसभा मतदारसंघही (Solapur Lok Sabha Constituency) काँग्रेससाठी (Congress) असाच बालेकिल्ला होता. 1952 सालापासून 2019 पर्यंतच्या 17 लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल 12 वेळा इथून काँग्रेसने विजय नोंदविला आहे. 1957 साली तायाप्पा हरी सोनावणे यांनी या विजयाचा पाया रचला होता. त्यानंतर 1962 साली मडेप्पा उर्फ अप्पासाहेब काडादी, 1967, 1971, 1977 सुरजरत्न दमाणी, 1980, 1984 गंगाधर कुचन, 1989, 1991 धर्मन्ना सादुल या काँग्रेस नेत्यांनी देशाच्या संसदेत सोलापूरचे प्रतिनिधित्व केले. (politics of Solapur Lok Sabha Constituency)

1996 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक आणि भाजपचे (BJP) पश्चिम महाराष्ट्रातील पहिले आमदार अशी ओळख असलेल्या लिंगराज वल्याळ (Lingaraj Valyaal) यांनी भाजपचा झेंडा फडकवला. त्यानंतर त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले खासदार होण्याचाही मान मिळविला. पण त्यानंतरच्या काळात सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांनी राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेत काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवला. पुढे शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या 2003 च्या पोटनिवडणुकीत आणि 2004 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पुन्हा हा मतदारसंघ आपल्याकडे खेचला. मात्र 2009 साली सुशीलकुमार शिंदेंनी दिल्लीच्या राजकारणात उडी घेत सोलापूरमध्ये काँग्रेसला विजय मिळवून दिला. त्यानंतर ते केंद्रात गृहमंत्रीही झाले.

भाजपचं हिंदुत्व बेगडी, हा सगळा कचरा साफ करणार; उद्धव ठाकरे कडाडले

त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अशी सत्तासोपानातील सर्वोच्च पदे मिळवून देणारा मतदारसंघ अशी सोलापूरची ओळख बनली. पण 2014 साली मोदी लाटेत भाजपच्या नवख्या शरद बनसोडे यांनी माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांचा पराभव करत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. 2019 साली राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना रिंगणात उतरवत भाजपने सलग दुसऱ्यांदा हा मतदारसंघ आपल्याकडे कायम ठेवला. आता 10 वर्षांनंतर याच माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी भाजपला आस्मान दाखवून मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडे घेत एक जय -परायजयाचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे.

याच सगळ्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे राजकारण नेमके आहे तरी कसे याचा घेतलेला हा आढावा.

सोलापूर मतदारसंघाची रचना :

मोहोळ, सोलापूर उत्तर, सोलापूर मध्य, सोलापूर दक्षिण, अक्कलकोट आणि पंढरपूर अशा सहा विधानसभा मतदारसंघांनी मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झाला आहे. या सहापैकी चार मतदारसंघांमध्ये भाजपचे, एक काँग्रेस आणि एक राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे आमदार आहेत. यात मोहोळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे यशवंत माने, सोलापूर मध्यच्या काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, सोलापूर उत्तरचे विजय देशमुख, सोलापूर दक्षिणमध्ये सुभाष देशमुख, अक्कलकोटमध्ये सचिन कल्याणशेट्टी आणि पंढरपूरमध्ये समाधान आवताडे असे भाजपचे प्रतिनिधित्व करत आहेत. सोलापूर मतदारसंघात लिंगायत, मराठा आणि मागसवर्गीय या तिन्ही समाजाचा मोठा प्रभाव आहे.

सद्यस्थिती काय?

2019 मधील पराभवानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी राजकारणातून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यांनी आपल्या मुलीसाठी 2024 च्या लोकसभेची फिल्डिंग लावली आहे. प्रणिती शिंदेंच सोलापूरमधून काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवारी असतील अशी घोषणाच त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर त्याच योग्य उमेदवार असल्याचा निर्वाळा देत आपण हायकमांडशी बोलणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दुसऱ्या बाजूला जातीचे दाखले वादग्रस्त ठरल्याने भाजपकडून जयसिद्धेश्वर स्वामी यांना पुन्हा उमेदवारी मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या जागी राज्यसभेचे माजी खासदार अमर साबळे, माजी खासदार शरद बनसोडे आणि माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची चर्चा आहे.

परदेश दौऱ्यांवर 45 कोटींचा खर्च, फडणवीसांच्या OSD च्या कंपनीला परीक्षेचं काम; रोहित पवारांचे आरोप

वंचित बहुजन आघाडी काय भुमिका घेणार?

सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीची भूमिका निर्णायक राहिली आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी या मतदारसंघातून दावा ठोकला होता. त्यांच्या उमेदवारीने इथली राजकीय गणिते मोठ्या प्रमाणात बदलली. डॉ. जयसिद्धेश्वर या अध्यात्मिक गुरु असलेल्या आणि राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या नवख्या उमेदवारानेही सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल दीड लाख मतांच्या फरकाने पराभव केला. त्या निवडणुकी प्रकाश आंबेडकर यांना 1 लाख 70 हजार मते मिळाली होती. वंचितमुळे मतविभागणी झाल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसने केला होता. आता यंदाच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग होणार का? झाल्यास सोलापूर कोणाला जाणार, न झाल्यास वंचितची भूमिका काय असणार? असे विविध सवाल सध्या विचारले जात आहेत.

follow us