Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. एकीकडे एनडीएकडून (BJP) घटक पक्षांना एकत्र करण्यात येत असतानाच दुसरीकडे ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीतही भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. अशातच आता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा (VBA) अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत येण्याआधीच प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) लोकसभेसाठी 12 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. यासंदर्भात आंबेडकरांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मल्लिकार्जून खर्गेंना पत्रही लिहिलं आहे.
I wrote a letter today to Shri @OfficeofUT, Shri @PawarSpeaks and Shri @kharge to deliberate and decide on VBA’s proposed formula of 12+12+12+12 for Maharashtra.
I reiterated our interest to join the MVA and INDIA.
I also shared why VBA proposed the formula, especially when… pic.twitter.com/nYB3v7Rz9h
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 28, 2023
भाजपला पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडीकडून जोरदार रणनीती आखण्यात येत आहे. कालच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वंचित सोबत घेण्याबाबतचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता वंचितला आघाडीत घेण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला आहे. प्रकाश आंबेडकरांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं, महाविकास आघाडीकडे आम्ही जागांच्या वाटपाबाबतचा प्रस्ताव पाठवला असून राज्यात भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीसोबत युती करण्यात इच्छूक आहोत, आम्ही पाठवलेल्या प्रस्तावावर विचार करुन निर्णय कळवावा, अशी विनंती प्रकाश आंबेडकरांनी पत्राद्वारे केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी इंडिया आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. आंबेडकर यांनी वेळोवेळी सूचित केले की आपण इंडिया आघाडीचा भाग बनण्यास तयार आहोत. मात्र आजपर्यंत त्यांना याचे स्पष्ट उत्तर मिळू शकलेले नाही. पाटणा आणि बंगळुरूनंतर विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत झाली तेव्हा त्यांना बोलावणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही.
“काही गोष्टींवरुन मतभेद” : नाईक निंबाळकर-मोहिते पाटलांमधील वाद मिटविण्यात बावनकुळेही फेल
लोकसभा निवडणुका जवळ आल्याचे पाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा न झाल्यास 50-50 च्या फॉर्म्युल्यावर उद्धव ठाकरे गटासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी दिला होता. इंडिया आघाडी स्थापन होण्यापूर्वी गेल्या वर्षी राज्यात उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षात युती होती, ती आजही कायम आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहमती दर्शवल्यानंतर वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत स्थान मिळेल अशी आशा होती, मात्र तसे झालेले नाही. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर एकटे लढले तर राज्यातील दलित आणि मागासवर्गीय महाविकास आघाडीवर नाराज होऊ शकतात. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांबाबत संयम बाळगत आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले आहे की प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत समाविष्ट करावे. पण प्रत्येक पक्ष स्वतःचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे.