राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाच्या तयारीत श्वेता महाले; ऐनवेळी निर्णय फिरला, म्हणाल्या, ‘बरं झालं!’

Rahul Bondre राहुल बोंद्रेंच्या भाजप प्रवेशाची तयारी सुरू असताना श्वेता महाले मुंबईत दाखल झाल्या. मात्र राहुल बोंद्रेंनी निर्णय बदलला.

Shweta Mahale on Rahul Bondre’s BJP Entry

Shweta Mahale on Rahul Bondre’s BJP Entry

Shweta Mahale on Rahul Bondre’s BJP Entry: चिखलीच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमध्ये भाजपच्या आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांची भूमिकाही चर्चेचा विषय ठरली आहे. काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे (Rahul Bondre) यांच्या भाजप प्रवेशाची तयारी जवळपास पूर्ण झाली होती. बोंद्रेंच्या पक्षप्रवेशासाठी महाले एक दिवस आधीच मुंबईत दाखल झाल्या होत्या. मात्र, ऐनवेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि राहुल बोंद्रे यांच्यात फोनवर संवाद झाला आणि बोंद्रे यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय बदलला. ही माहिती समजल्यानंतर श्वेता महाले यांची पहिली प्रतिक्रिया होती—’बरं झालं!’

मोठी बातमी: राहुल बोंद्रेंचा भाजप प्रवेश रद्द; राहुल गांधींच्या एका फोननंतर निर्णय बदलला

बोंद्रेंच्या पक्षप्रवेशाची तयारी महालेंकडून सुरू

राहुल बोंद्रे यांचा भाजप प्रवेश मतदारसंघाच्या आमदार म्हणून श्वेता महाले यांच्या उपस्थितीत होणार होता. त्यासाठी कार्यक्रमाचे नियोजन, कार्यकर्त्यांची व्यवस्था आणि भाजप कार्यालयाबाहेरील बॅनरपासून भोजन व्यवस्थेपर्यंतच्या तयारीबाबत महाले यांच्या यंत्रणेशी चर्चा सुरू होती.

बोंद्रे हे दिवसभर श्वेता महाले आणि त्यांच्या पीएच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. मुंबईत आल्यानंतर आधी महाले यांच्या निवासस्थानी जाण्याचे त्यांचे नियोजन होते. मात्र, नंतर त्यांनी आधी अंधेरीला मुलाकडे जाणार असल्याचे महालेंना कळवले. त्यानंतर मंत्रालयात भेटण्याचेही नियोजन झाले होते.

…तर दुष्काळच पडला नसता, शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर भाजप मंत्री जयकुमार गोरेंचा टोला

दुपारी मुंगसाजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर भाजप कार्यालयात पोहोचणे आणि सायंकाळी पक्षप्रवेश करण्याचे बोंद्रेंचे नियोजन होते. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार होता. कार्यक्रमाचा प्रोटोकॉलही महालेंना आधीच मिळाला होता.

दोन महिन्यांपासून पक्षप्रवेशाच्या हालचाली सुरू होत्या

राहुल बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशाच्या हालचाली अचानक सुरू झालेल्या नव्हत्या, तर गेल्या दोन महिन्यांपासून त्यासंदर्भात चर्चा सुरू होती, असे श्वेता महाले यांच्या भूमिकेतून समोर आले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनाही या हालचालींची माहिती होती, असा दावा महाले यांनी केला आहे.

श्वेता महाले लोकसभेसाठी; राहुल बोंद्रे चिखलीतून लढणार ? 2029 साठी भाजपचा प्लॅन ठरला

याच मुद्द्यावर महालेंनी प्रश्न उपस्थित केला आहे. बोंद्रे यांना काँग्रेसमध्येच थांबवायचे होते, तर राहुल गांधी यांच्याशी यापूर्वीच त्यांचा संवाद का घडवून आणला नाही? पक्षप्रवेशाच्या अगदी पूर्वसंध्येलाच हा प्रयत्न का करण्यात आला, असा सवाल त्यांनी उपस्थित केल्याचे सांगितले जाते.

राहुल गांधींच्या फोननंतर चित्र बदललं

सोमवारी सायंकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बोंद्रे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर राहुल गांधी यांना कॉन्फरन्स कॉलवर जोडण्यात आल्याची माहिती आहे. या संभाषणादरम्यान राहुल गांधी यांनी बोंद्रे यांना पक्ष सोडू नये आणि दबावाला बळी पडू नये, असा संदेश दिला.

या संवादानंतर बोंद्रे यांनी काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण राजकीय चित्रच बदलले.

बावनकुळेंच्या फोनने आणखी चर्चा

या घडामोडीनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्वेता महाले यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याचे सांगितले जाते. राहुल बोंद्रे यांनी आदल्या दिवशीच आपल्याला संदेश पाठवून भाजप प्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती केली होती, अशी माहिती बावनकुळे यांनी दिल्याचे महाले यांनी नमूद केले.

विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलिसांचा मोठा निर्णय! तब्बल 150 मंडळांना मुख्य मिरवणुकीत प्रवेश नाही

यामुळे बोंद्रे यांचा भाजप प्रवेश किती पुढे गेला होता, याची कल्पना येत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

आता महालेंची पुढची भूमिका काय?

राहुल बोंद्रे यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतल्यानंतर या संपूर्ण प्रकरणावर श्वेता महाले यांची सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, बोंद्रे यांच्या भाजप प्रवेशासाठी झालेली तयारी, ऐनवेळी बदललेला निर्णय आणि त्यानंतर समोर आलेला राहुल गांधींचा फोन यामुळे चिखलीच्या राजकारणात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.

बंद खोलीत मराठा समाजाचे कोणते प्रश्न मांडायचे होते? बारस्करांचा जरांगेंना सवाल

आता राहुल बोंद्रे आणि श्वेता महाले यांच्यातील राजकीय समीकरणांवर या घडामोडींचा काय परिणाम होतो, तसेच भाजप आणि काँग्रेसकडून पुढे कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version