बंद खोलीत मराठा समाजाचे कोणते प्रश्न मांडायचे होते? बारस्करांचा जरांगेंना सवाल
बारस्कर यांनी जरांगे यांच्या भूमिकेपासून ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या कथित कंत्राटापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले.
Baraskar’s question to Jarange : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आरक्षण अभ्यासक अजय बारस्कर यांनी मनोज जरांगे यांच्यावर जोरदार टीका करत अनेक गंभीर आरोप केले आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना बारस्कर यांनी जरांगे यांच्या भूमिकेपासून ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींच्या कथित कंत्राटापर्यंत अनेक मुद्दे उपस्थित केले. मात्र, बारस्कर यांनी केलेल्या या आरोपांची स्वतंत्र पुष्टी झालेली नसून त्यावर मनोज जरांगे किंवा संबंधितांकडून काय स्पष्टीकरण दिले जाते, हे देखील महत्वाचं आहे.
बारस्कर म्हणाले की, आधीचे मनोज जरांगे आणि आताचे मनोज जरांगे अशा दोन वेगवेगळ्या वृत्ती पाहायला मिळत आहेत. सुरूवातीच्या काळात आपण देखील जरांगे यांच्या आंदोलनाचे समर्थक होतो, असे सांगत त्यांनी जुन्या आंदोलनाची आठवण करून दिली. जरांगे उपोषणाला बसले असताना मंत्री आणि नेते त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यावेळी अर्जुन खोतकर यांनी बाजूला जाऊन चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला असता जरांगे यांनी बंद खोलीत चर्चा करण्यास नकार देत बैठक सर्वांसमोरच घेण्याची भूमिका घेतली होती. त्या भूमिकेमुळे माझ्यासह महाराष्ट्रातील अनेकांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला, असा दावा बारस्कर यांनी केला आहे.
मात्र त्यानंतर जरांगे यांच्या आजूबाजूला कंत्राटदार आणि ठेकेदार जमा झाले आणि त्यांची भूमिका बदलत गेल्याचा आरोप बारस्कर यांनी केला. अलीकडील एका बैठकीचा संदर्भ देत पत्रकारांना काही वेळ बाहेर जाण्यास सांगण्यात आल्याच्या घटनेवर देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केले. मराठा समाजाच्या हिताचे असे कोणते प्रश्न होते, ज्यावर बंद दाराआड चर्चा करण्याची गरज होती? असा सवाल त्यांनी केला. याच मुद्द्यावरून बारस्कर यांनी जरांगे यांच्यावर टीका करत त्यांचा उल्लेख बंद खोलीतला टेंडरयोद्धा असा केला.
28 सप्टेंबरला शरद पवार दुष्काळी भागांच्या दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घेणार परिस्थितीचा आढावा
बारस्कर यांनी काही कांतारतांबाबत देखील गंभीर आरोप केले. समाजाच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो आणि कोट्यवधी रुपयांची कंत्राटे मिळवली जातात, असा दावा त्यांनी केला आहे. एका इन्फ्रा कंपनीचा उल्लेख करत अवघ्या काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कंपनीला सुमारे २६० कोटी रुपयांची कामे कोणत्या निकषांच्या आणि क्षमतेच्या आधारावर मिळाली? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. या आर्थिक व्यवहारांची आणि कंत्राटांची चौकशी व्हावी, असा त्यांच्या वक्तव्याचा रोख होता.
यावेळी बारस्कर यांनी स्वतःला धमक्या मिळत असल्याचा देखील दावा केला. मला दिवसाला ७०० ते ८० धमक्यांचे फोन येतात. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत आणि तरीही मला कोणतेही पोलीस संरक्षण नाही, असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. तसेच कंत्राट घेणे चुकीचे नसल्याचे स्पष्ट करत बारस्कर यांनी आक्षेप कंत्राट मिळवण्याच्या कथित कार्यपद्धतीवर असल्याचे सांगितले. मराठा समाजाच्या नावाचा वापर करून सरकारी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला जात असेल, तर त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
एकूणच अजय बारस्कर यांनी पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत कंत्राटे, बंद दाराआड झालेल्या चर्चा आणि कथित दबावतंत्रासंदर्भात अनेक आरोप केले आहेत.