Download App

‘एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ’; राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Raju Shetty : गेल्या तीन-चार दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पावसांचा (Unseasonal rain) शेतकऱ्यांना तडाखा बसला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘अवकाळी पाऊस आणि हवामानामुळे पिकांचे नुकसान झालंय. या एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झालाय’, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टी पुढं म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि गारपीटीने राज्यात कांदा, भोपळा, द्राक्ष, पेरू तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपतो. पण निसर्गाच्या एका फटक्याने होत्याचं नव्हतं होतं. अशा अवस्थेत एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्र्यांना प्रभुरामचंद्राचे दर्शन घ्यायचे असेल तर खुशाल घ्या ही तुमची व्यक्तिगत बाब आहे. पण राज्याच्या प्रमुखाला व्यक्तिगत बाबीपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असायला हवं. कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका, अशी अवाहन करत राजू शेट्टी यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीका केली आहे.


अवकाळ्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान, शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

ज्या प्रभुरामचंद्राच्या दर्शनाला आपण गेला आहात, त्या प्रभुरामचंद्राने प्रजेला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपले होते म्हणून आजही लोक म्हणतात रामाचे राज्य आले पाहिजे. तुमच्या राज्यात रामाचे राज्य निर्माण करायचे असेल तर संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदतीचा हात द्या, अशी मागणी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारला केली आहे.

दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांवर तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचे (unseasonal rain) संकट आले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे (farmers) प्रचंड नुकसान झाले आहे. कांदा, आंबा, द्राक्षे, टरबूज, संत्रा कलिंगड, गहू, हरभरा, काजू अशी सर्वच हाताशी आलेली पिकं शेतकऱ्यांच्या हातून गेली आहेत.

PHOTO : मुख्यमंत्री शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर; अवकाळीग्रस्त शेतीची केली पाहणी

बीड, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, कोकण, अमरावती, बुलढाणा, सांगली, परभणी, यवतमाळ या जिह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. काही दिवसांपूर्वींच अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. त्यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने पंचनामे लवकर झाले नव्हते. त्यामुळे अजूनही शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित आहे.

Tags

follow us