Rajya Sabha By-Election : महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीनंतर आता निवडणूक आयोगाने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या (Rajya Sabha By-Election) सहा रिक्त जागांवर निवडणुकीसाठी अधिसूचना जारी केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 20 डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे तर त्याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे. आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) तीन आणि ओडिशा (Odisha) , हरियाणा (Haryana) आणि पश्चिम बंगालमधील (West Bengal) प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यसभेच्या सहा रिक्त जागांसाठी 10 डिसेंबर ही नामांकनाची अंतिम तारीख आहे. 11 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. 13 डिसेंबरपर्यंत उमेदवार अर्ज माघार घेऊ शकतात आणि 20 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
नुकतंच झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर विरोधकांची मोठी परीक्षा आहे. वायएसआरसीपी सदस्य व्यंकटरमण राव मोपीदेवी, बीधा मस्तान राव यादव आणि रायगा कृष्णय्या यांनी ऑगस्टमध्ये राजीनामा दिल्याने आंध्र प्रदेशात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या होत्या. बिधा मस्तान राव यादव आणि रायगा कृष्णय्या यांचा कार्यकाळ 21 जून 2028 रोजी संपणार होता.
तर मोपीदेवी यांचा कार्यकाळ 21 जून 2026 पर्यंत होता. तर सुजित कुमार यांच्या राजीनाम्यानंतर ओडिशात राज्यसभेची एक जागा रिक्त झाली आहे. त्यांच्या कार्यकाळ देखील 2 एप्रिल 2026 पर्यंत होता. तर आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आल्यानंतर टीएमसी नेते जवाहर सरकार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता त्यांच्या देखील कार्यकाळ 2026 पर्यंत होता.
तर हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजप नेते कृष्णलाल पनवार यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. विधानसभा निवडणुकीनंतर आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी आणि ओडिशात राज्यसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला फायदा होणार हे जवळपास निश्चित आहे.