महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस ( Ramesh Bais ) यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Bhagatsingh Koshyari ) यांची राज्यपाल पदावरून बदली करण्यात आलेली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे ( Rupali Thombare ) यांनी कोश्यारींवर निशाणा साधला आहे. विषारी राज्यपाल बाहेर गेले, असे म्हणत त्यांनी कोश्यारींवर टीका केली आहे.
महाराष्ट्रातून भाज्यपाल विषारी कोश्यारी यांना परत पाठवल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानते. राज्यपाल हे एक संविधानिक पद असते. परंतु कोश्यारी यांनी या पदाचा गैरवापर केला, असे म्हणत ठोंबरे यांनी राज्यपालांना लक्ष केले आहे. तसेच कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांविषयी वादग्रस्त विधाने केली. राज्यपाल पदावर बसून त्यांनी भाजपचा अजेंडा राबवला. हा राजीनामा त्यांनी आधीच द्यायला पाहिजे होता. हा राजीनामा घेतल्याबद्दल मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आभार मानते, असे ठोंबरे यांनी सांगितले.
तसेच आता जे नवीन राज्यपाल येणार आहेत, त्यांनी संविधानानुसार कायद्याच्या माध्यमातून काम करावे. कुठेही भाजपचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करू नये. आत्ताच हे सरकार कोश्यारींमुळे स्थापन झालेले आहे. कोश्यारी यांचे निवासस्थान एक प्रकारे चहाची टपरी झाले होते. त्या ठिकाणी कोणीही जात येत होते. त्यामुळे आता कोश्यारींच्या हकालपट्टीमुळे महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रात लोक आता पेढे सुद्धा वाटत आहेत, अशी टीका ठोंबरे यांनी भाजप व कोश्यारींवर केली आहे.