Sanjay Raut MPSC Students Protest: पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी भेट देत आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभारावरून सुरू असलेल्या या आंदोलनाला राजकीय पाठिंबा मिळत असताना राऊत यांनी राज्य सरकार आणि आयोगावर जोरदार टीका केली. एमपीएससी आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्यासह परीक्षा पद्धती आणि भरती प्रक्रियेबाबत विविध मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहेत.
‘पुण्यातील आंदोलन महाराष्ट्राचं जंतरमंतर’
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पुण्यातील आंदोलनाची तुलना दिल्लीतील जंतरमंतरवरील आंदोलनाशी केली. “पुण्यातील आंदोलन हे महाराष्ट्रातील जंतरमंतर आहे. फडणवीसांपर्यंत आवाज जाऊ द्या. हक्क घेतल्याशिवाय जाऊ नका. हे निवडणुका नीट घेऊ शकत नाहीत, स्पर्धा परीक्षा काय नीट घेणार? एमपीएससी आयोगाचं संपूर्ण शुद्धीकरण करायला हवं,” असं राऊत म्हणाले.
आंदोलनाला व्यापक स्वरूप देण्याचे आवाहन
एमपीएससी विद्यार्थ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे, अशी भूमिका राऊत यांनी मांडली. “असंच आंदोलनाचं वातावरण प्रत्येक जिल्ह्यात झालं तर मुख्यमंत्र्यांना फिरता येणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
‘अंधभक्त बनवण्याचा कारखाना’
यावेळी राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सरकारच्या धोरणांवरही टीका केली. “विद्यार्थ्यांची, तरुणांची डोकी खराब करून त्यांना शिक्षणापासून दूर करून त्यांना अंधभक्त बनवण्याचा कारखाना या सरकारने चालवला आहे. हा अंधभक्तीच्या गांजाची नशा उतरवायचं काम आपण करत आहोत,” असं ते म्हणाले.
MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना थेट फोन, म्हणाले- ‘संवादातून मार्ग काढा’
‘मंत्रालयातले उंदीर वाघाशी काय लढताय?’
आपल्या राजकीय संघर्षाचा उल्लेख करत राऊत यांनी सरकारवर आणखी जोरदार हल्ला चढवला. “आम्हाला तुरुंगात टाकलं, आमच्या मागे ईडी लावली, पण आम्ही बाहेर आलो आणि आमचा पंजा परत त्यांच्यावर टाकला. मंत्रालयातले उंदीर तुम्ही वाघाशी काय लढताय,” असं राऊत म्हणाले.
‘रोहित पवारांचं आंदोलन पुढच्या पिढीसाठी महत्त्वाचं’
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाचं समर्थन करताना राऊत यांनी हे आंदोलन केवळ एमपीएससी विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित नसल्याचं म्हटलं. “हे रोहित पवारांनी उभं केलेलं आंदोलन महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीसाठी मोलाचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
राज्यातील सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना राऊत म्हणाले, “राज्यकर्त्यांना लढणारी पिढी नष्ट करायचीय. राज्यातील बहुजन समाजातील दलित, शोषित वर्गांना प्रशासनाच्या मुख्य प्रवाहात येऊ द्यायचं नाही. हे आम्ही गेली 10 वर्षं पाहतोय. जातीचं राजकारण करायचं, राज्याचं ऐक्य तोडायचं.”
विमानाचे अपहरण करून ते क्रॅश करायचे होते; फ्लाय दुबई प्रकरणातील चौकशीत सहपायलची धक्कादायक माहिती
‘हा महाराष्ट्र कुणापुढे झुकणार नाही’
पुढे राऊत यांनी महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक परंपरेचा उल्लेख करत सरकारवर निशाणा साधला. “लक्षात घ्या, हा महाराष्ट्र शिव, फुले, शाहू, आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या शक्तीपुढे झुकणार नाही,” असं ते म्हणाले.
‘लाठ्या-काठ्या खायची वेळ आली तर सर्वात पुढे राहीन’
आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना संघर्ष सुरू ठेवण्याचं आवाहन करत राऊत यांनी त्यांच्या पाठिशी राहण्याची भूमिका स्पष्ट केली. “हा संघर्ष, आंदोलन चालू ठेवा. लाठ्या-काठ्या खायची वेळ आली तर मी सर्वात पुढे राहीन. तुमच्या संघर्षाला भगवा सलाम,” असं म्हणत त्यांनी विद्यार्थ्यांना समर्थन दिलं.
दरम्यान, पुण्यातील एमपीएससी आंदोलन सध्या विविध ठिकाणी सुरू असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांमध्येही काही फरक असल्याचे समोर आले आहे. एका गटाकडून एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, तर अन्य गट परीक्षा पद्धतीसह वेगवेगळ्या मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत.
