विमानाचे अपहरण करून ते क्रॅश करायचे होते; फ्लाय दुबई प्रकरणातील चौकशीत सहपायलची धक्कादायक माहिती
flydubai : फ्लाय दुबईचं विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या सहपायलट हमाम अल-हमामीबाबत चौकशीत धक्कादायक माहिती.
Flydubai Co Pilot Plane Crash Attempt : फ्लाय दुबईच्या तेल अवीवकडं जाणाऱ्या (Dubai) प्रवासी विमानाचं कथितरित्या अपहरण करून ते क्रॅश करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला सहपायलट हमाम अल-हमामी याच्याबाबत तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमान सौदी अरेबियात उतरवल्यानंतर चौकशीदरम्यान त्यानं विमान जाणीवपूर्वक पाडण्याचा प्रयत्न केल्याचं सांगितल्याचा दावा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तात करण्यात आला आहे. आपण मृत्यूला घाबरत नसल्याचंही त्यानं सांगितल्याचं या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. 29 वर्षीय ओमानी नागरिक असलेल्या हमामीचं कट्टरतावादी विचारांकडं वळण कसं लागलं आणि पूर्वी त्याच्याबाबत माहिती असूनही त्याला पुन्हा कॉकपिटमध्ये काम करण्याची परवानगी कशी मिळाली, याचा तपास सुरू आहे.
हमामी यापूर्वी ओमान एअरमध्ये कार्यरत होता. त्यावेळी अधिकाऱ्यांना तो कट्टरतावादी संकेतस्थळांना भेट देत असल्याचं आढळल्यानंतर त्याला विमान उड्डाणापासून दूर करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्यावर कट्टरतावादी विचारांपासून दूर करण्याचा कार्यक्रम राबवण्यात आला आणि त्याला डेस्क जॉब देण्यात आला. ओमान एअरमधून बाहेर पडल्यानंतर त्यानं यूएईमध्ये नोकरी मिळवली आणि फेब्रुवारी 2026 मध्ये फ्लाय दुबईनं त्याला कामावर घेतलं. त्याच्या पूर्वीच्या इतिहासाबाबत फ्लाय दुबईला नेमकी किती माहिती होती किंवा नियुक्तीपूर्वी ओमानकडून त्याची माहिती मागवण्यात आली होती का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्याचबरोबर सीरियातील त्याच्या वास्तव्याचाही तपास केला जात आहे.
हमामी हा ओमानी वडील आणि सीरियन आईचा मुलगा असून त्याचं बालपण सीरियातील काही काळात गेलं. त्या काळात सीरियात गृहयुद्ध सुरू होतं आणि बशर अल-असद यांच्या सरकारविरोधात इस्लामवादी बंडखोर लढत होते. त्याच काळात हमामी कट्टर विचारांकडं वळला होता का, याचा तपास अधिकारी करत आहेत. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटचाही तपासाचा भाग बनला असून, डिलीट केलेल्या एक्स अकाउंटवरील 3,000 हून अधिक स्क्रीनशॉट इंटरनेट आर्काइव्हच्या माध्यमातून उपलब्ध असल्याचं वृत्त आहे. या पोस्टमध्ये महिलांनी नोकरी करू नये, धार्मिक महिलांनी बुरखा घालावा, अशा प्रकारचे अतिरूढीवादी आणि महिलांविरोधी विचार व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या पोस्टवरून तो नेमका कधी हिंसक विचारांकडं वळला किंवा त्याचा विमानावरील कथित हल्ल्याशी थेट संबंध होता, हे अद्याप स्पष्ट होत नाही.
30 सप्टेंबर रोजी फ्लाय दुबईच्या फ्लाइट 1073 मध्ये हमामीनं कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर हल्ला करून विमानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर विमान अवघ्या 30 सेकंदांत 16,000 फुटांहून अधिक खाली आलं. जखमी कॅप्टननं कॉकपिटचा दरवाजा उघडल्यानंतर प्रवासी आणि क्रू सदस्यांनी हमामीला ताब्यात घेतलं, तर विमानातील दोन ऑफ-ड्युटी पायलटांनी विमान स्थिर ठेवून ते सौदी अरेबियात उतरवण्यात मदत केली. विमानाच्या आपत्कालीन लँडिंगनंतर सौदी अधिकाऱ्यांकडून झालेल्या चौकशीदरम्यान हमामीनं विमान जाणीवपूर्वक क्रॅश करण्याचा हेतू मान्य केल्याचा दावा करण्यात आला आहे. यूएई, सौदी अरेबिया आणि इस्रायलमधील अधिकारी हा प्रकार त्यानं एकट्यानं केला की त्याचे इराणसह अन्य बाह्य गटांशी काही संबंध होते, याचा तपास करत आहेत.