MPSC विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात; फडणवीसांना थेट फोन, म्हणाले- ‘संवादातून मार्ग काढा’
MPSC Students Protest; एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची शरद पवारांनी दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
MPSC Students Protest: पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. 2 ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या आंदोलनात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारही सहभागी झाले आहेत. एमपीएससीचे अध्यक्ष भीमनवार यांनी पदाचा राजीनामा द्यावा, या प्रमुख मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. मात्र, तीन दिवस उलटूनही सरकारकडून ठोस दखल घेतली जात नसल्याने विद्यार्थ्यांनी आता ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.
विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींनी पवार यांच्यासमोर आंदोलनाची पार्श्वभूमी आणि विविध मागण्या मांडल्या. पवार यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांची भूमिका जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संवाद साधून विद्यार्थ्यांच्या मागण्यांची माहिती दिली. तसेच, आंदोलनाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली.
शरद पवार म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी संवाद होणे गरजेचे आहे. “माझ्याकडे विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी आले होते. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत आणि त्यांच्या मागण्यांबाबत मार्ग निघायला हवा. सुसंवाद असायला हवा. एका बाजूने राज्याचे मुख्यमंत्री किंवा त्यांचे सहकारी आणि दुसऱ्या बाजूने विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी यांच्यात चर्चा व्हावी. मात्र, जर चर्चा झाली नाही तर प्रश्न सुटणार नाहीत. कोणताही प्रश्न सुटायचा असेल तर सुसंवाद असायला हवा,” असे त्यांनी स्पष्ट केले.
Asian Games 2026 : भारताची 85 पदकांसह शानदार कामगिरी, पदकतालिकेत कितव्या स्थानावर ?
विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. “विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन मार्ग काढला जावा, यासाठी मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मात्र, देवेंद्र फडणवीस हे आज मुंबईत नाहीत, ते नागपूरला आहेत. ते बहुतेक उद्या सकाळी मुंबईला येतील. मुख्यमंत्री फडणवीसांना मी विनंती केली की, तुम्ही मुंबईत आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष घाला. विद्यार्थ्यांशी संवाद साधा. जर आवश्यकता असेल तर तुम्ही आणि विद्यार्थ्यांचे काही प्रतिनिधी चर्चा करा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जे शक्य आहे ते सर्व करण्याचं आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवलं,” असे पवार म्हणाले.
‘ज्ञानेश कुमारच नाही, मोदी-शाहांनाही घरी जावं लागेल’, संजय राऊतांचा मोठा दावा
शरद पवारांच्या फोननंतर मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत काय भूमिका घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होऊन त्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षाही शरद पवार यांनी व्यक्त केली.