Sanjay Raut on ABVP-NSUI Clash : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या उपस्थितीत पुण्यात आज ‘छात्रों की गूंज’ (Chhatron Ki Goonj) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, कार्यक्रमाआधीच शिवाजीनगर येथील सीईओपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या (NSUI) कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की आणि मारामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर पुण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
या राड्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि ABVP वर जोरदार निशाणा साधला. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापासून ते पोलिसांनी घातलेल्या अटी, ABVP-NSUI कार्यकर्त्यांमधील राडा आणि ‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यापर्यंत राऊत यांनी भाष्य केलं.
मुळात एबीव्हीपी गुंडगिरी करते ही मोठी गोष्ट
ABVP आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, “मुळात एबीव्हीपी गुंडगिरी करते ही मोठी गोष्ट आहे. राहुल गांधी पुण्यात येत आहेत. जरी हे एबीव्हीपी आणि नरेंद्र मोदी, अमित शहा यांना मान्य नसेल तरी मोदी, शहा भविष्यात संसदेत राहुल गांधींच्या समोर विरोधी पक्षात बसतील, हे तर त्यांना मान्य करावे लागेल.”
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर 30 अटी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यासाठी पोलिसांनी घातलेल्या कथित 30 अटींवरही राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. “राहुल गांधींना पुण्याच्या पोलिसांनी पुण्यात येण्यासाठी 30 अटी टाकल्या. राहुल गांधी हे काय परदेशातून आलेले आहेत का? पण मोदी, शहा आले की त्यांना अशा अटी टाकल्या जातात का?” असा सवाल त्यांनी केला.
पुण्यात ‘एमएच-12’चा अध्याय संपणार! आता वाहनांना मिळणार ‘एमएच-61’ची नवी ओळख
पुढे ते म्हणाले, “अटी टाकण्यामागचं कारण एकच, या देशातील भाजपाची यंत्रणा आणि सत्ता यांच्या पायाखालची वाळू सरकली. कारण मोदी सरकार राहुल गांधींना घाबरले आहे. तसेच, मी म्हटल्याप्रमाणे 17 सप्टेंबरनंतर मोदी सरकारच्या पडझडीला सुरुवात होणार आहे,” असा दावाही संजय राऊत यांनी केला.
राहुल गांधींसमोर सरकार झुकलं
राहुल गांधी यांनी शुक्रवारी (21 ऑगस्ट) केलेल्या आंदोलनाचा उल्लेख करत राऊत म्हणाले, “काल राहुल गांधींनी संसद मार्ग पोलिस ठाण्यात जाऊन जो ठिय्या मांडला आणि जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तिवर गुन्हा दाखल करायला लावला व सरकार त्यांच्यासमोर झुकलं.”
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?
गुंडगिरी भविष्यात मोडून काढली जाईल
पुण्यातील भाजपवरही राऊत यांनी टीका केली. “पुण्यातल्या भाजपच्या लोकांना वाटत असेल की ते पोलिसांच्या मदतीने फार गुंडगिरी करु शकतात, पण ही त्यांची गुंडगिरी भविष्यात मोडून काढली जाईल, भाजप हा डरपोक लोकांचा पक्ष आहे. सत्तेची कवच-कुंडलं आहेत तोवर भाजपची दादागिरी दिसेल. पण ज्या दिवशी त्यांची सत्ता जाईल त्या दिवशी 90 टक्के भाजप हा बिळात गेलेला असेल, असं राऊत यांनी म्हटलं.
वंदे मातरम् आणि भाजपचा संबंध आला कधी?
‘वंदे मातरम्’च्या मुद्द्यावरही संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. “वंदे मातरम आणि भाजपचा संबंध आला कधी? मुळात वंदे मातरम् आणि काँग्रेसचा जुना संबंध आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नाही त्यांनी वंदे मातरमची उठाठेव करू नये. उलट जंतरमंतरवर विद्यार्थी आंदोलक वंदे मातरम्, जनगणमन गात असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केलाय. हे फक्त ब्रिटिश काळात होत होतं. त्यामुळे भाजपने वंदे मातरमची उठाठेव करूच नये,” असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
भाजप हा डरपोक लोकांचा पक्ष
राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाबाबत बोलताना राऊत यांनी कार्यक्रम उधळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली. “राहुल गांधी पुण्यात येत आहेत. त्यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमाची भाजपने धास्ती घेतली आहे. राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम जर कोणी उधळून लावण्याचा प्रयत्न करत असेल तर तो दहशतवाद आहे. पुणे पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. राहुल गांधी विरोधी पक्षनेते आहेत,” असं संजय राऊत यांनी म्हटलं.
गद्दारांना युक्तिवाद नसतो; सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान संजय राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल
दरम्यान, राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधीच ABVP आणि NSUIच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे या वादाला आणखी राजकीय धार मिळाली आहे.
