‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात राजकीय वातावरण तापलं, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

अभाविपकडून शिवाजीनगर पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

News Photo   2026 08 22T103750.882

‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कार्यक्रमापूर्वीच सीओईपी परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली. या प्रकरणी आता शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या ५० ते ६० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

अभाविपकडून शिवाजीनगर पोलिसांत करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. सीओईपी परिसरातील वादानंतर दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत संबंधित कार्यकर्त्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

शिवाजीनगर पोलिसांनी युवक काँग्रेसच्या संबंधित कार्यकर्त्यांविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम ११५ (२), १८९ (१), १८९ (२), १९१ (२), ३५१ (१), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम ३७ (३) आणि १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. राहुल गांधी यांच्या ‘छात्रो की गूंज’ कार्यक्रमाआधी झालेल्या या राड्यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

follow us