मराठवाड्यात दुष्काळाचा दुहेरी फटका; वाचा, कुठं किती दिवसांचा चारा अन् कुठं किती दिवसांचा पाणीसाठा?
मराठवाड्यात दुष्काळामुळे पिकांसोबतच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असून विभागात 31 लाख 22 हजार मेट्रिक टन चारा आहे.
मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळाचा फटका (Farmer) शेतीबरोबरच पशुधनालाही बसत असुन जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पावसाअभावी पिकांचं नुकसान झाल्यानं अनेक भागांत चाऱ्याच्या उपलब्धतेकडे लक्ष लागलं आहे. 28 सप्टेंबर 2026 च्या कृषी पंचनामा अहवालानुसार विभागात एकुण 31 लाख 22 हजार 256 मेट्रिक टन चारा उपलब्ध असुन जिल्ह्यानुसार हा साठा 76 ते 179 दिवस पुरेल एवढा आहे.
चारा उपलब्धतेच्या बाबतीत धाराशिव जिल्हा आघाडीवर असुन तिथे 4 लाख 39 हजार 520 मेट्रिक टन साठा आहे. हा चारा सुमारे 179 दिवस पुरेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 लाख 3 हजार 92 मेट्रिक टन चारा असुन तो 175 दिवसांसाठी पुरेसा आहे. तर नांदेडमध्ये सर्वाधिक 8 लाख 4 हजार 168 मेट्रिक टन साठा असुन त्याची उपलब्धता सुमारे 174 दिवसांची आहे.
हिंगोलीत 2 लाख 44 हजार 366 मेट्रिक टन चारा उपलब्ध असुन हा साठा 138 दिवस पुरेल. लातूरमध्ये 2 लाख 53 हजार 477 मेट्रिक टन चारा असुन तो सुमारे 110 दिवस पुरेल. परभणीत 2 लाख 29 हजार 163 मेट्रिक टन साठा असुन त्याची उपलब्धता 101 दिवसांची आहे. बीडमध्ये 3 लाख 37 हजार 758 मेट्रिक टन चारा असुन तो 87 दिवस पुरेल.
जिल्हानिहाय आकडेवारी पाहता जालन्यातील परिस्थिती तुलनेनं चिंताजनक आहे. जालन्यात 2 लाख 49 हजार 96 मेट्रिक टन चारा उपलब्ध असुन हा साठा केवळ 76 दिवस पुरेल, अशी नोंद अहवालात करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळाचा कालावधी वाढल्यास कमी साठा असलेल्या जिल्ह्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान उभं राहु शकतं.
दरम्यान, दुष्काळ आणि पीक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात पंचनाम्यांची प्रक्रियाही सुरु आहे. 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत विभागातील 3,586 बाधित गावांचे पंचनामे पुर्ण झाल्याचं अहवालात नमुद आहे. मात्र बाधित गावांच्या संख्येबाबत अहवालातील वेगवेगळ्या नोंदींमध्ये 8,233 आणि 8,823 अशी तफावत दिसत असली तरी पुर्ण झालेल्या पंचनाम्यांची संख्या 3,586 असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
जिल्हानिहाय पाहता बीडमधील 512, परभणीतील 602, लातूरमधील 510, जालन्यातील 500, छत्रपती संभाजीनगरमधील 435, धाराशिवमधील 422, हिंगोलीतील 379 आणि नांदेडमधील 226 गावांचे पंचनामे पुर्ण झाले आहेत. पीक नुकसानीची अधिकृत नोंद आणि पुढील मदत किंवा नुकसानभरपाईसाठी पंचनामे महत्वाचे ठरणार असुन चारा व्यवस्थापनासोबतच उर्वरित गावांतील पंचनामे पुर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.