राज्यात पावसाची मोठी तूट, पुढील काही दिवस हवामान कोरडेच राहण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाली असली, तरी परतीच्या मान्सूनकडूनही राज्याला फारसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत.
Drought concerns deepen in many parts of Maharashtra : यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आता मान्सून माघारी फिरण्यास सुरुवात झाली असली, तरी परतीच्या मान्सूनकडूनही राज्याला फारसा दिलासा मिळण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि फिरण्यास नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. हवामानशास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांच्या माहितीनुसार, पुढील दोन दिवस राज्यातील काही तुरळक भागांमध्ये मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
मात्र त्यानंतर बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत निरभ्र आकाश, वाढता उकाडा आणि पावसाचा अभाव जाणवू शकतो. दरम्यान, परतीचा मान्सून सध्या उत्तर-पश्चिम भारतातून माघारी फिरत असून लवकरच मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांतूनही त्याची माघार अपेक्षित आहे. महाराष्ट्रातूनही परतीच्या मान्सूनची प्रक्रिया सुरू झाली असून साधारण ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापर्यंत मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसासाठी उरलेले काही दिवस राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत.
यंदाच्या मान्सूनमध्ये राज्यातील अनेक विभागांमध्ये पावसाची लक्षणीय तूट नोंदवली गेली आहे. कोकण-गोवा विभागात सुमारे 14 टक्के, तर मध्य महाराष्ट्रात सुमारे 11 टक्के पावसाची कमतरता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ही तूट 40 ते 50 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. सोलापूर, अहिल्यानगर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 टक्के पावसाची कमतरता जाणवत असून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची तूट नोंदवली गेल्याचे सांगितले जात आहे.
दिवाळीतील फटाक्यांवर निर्बंध कायम राहणार? CPCB कडून 15 ऑक्टोबरपर्यंत अहवाल
पावसाच्या कमतरतेचा थेट परिणाम जलसाठे, शेती आणि आगामी रब्बी हंगामावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असून काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, यंदाच्या कमी पावसामागे एल-निनोचा प्रभावही महत्त्वाचा घटक ठरला आहे. जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानुसार, आगामी हिवाळ्यात एल-निनोचा प्रभाव काही काळ अधिक तीव्र राहू शकतो. त्यानंतर त्याची तीव्रता कमी होत एप्रिलपर्यंत हवामानाची स्थिती पुन्हा सामान्य होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरुवातीला जाणवणाऱ्या उकाड्याबाबतही तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे. मान्सून माघारी फिरताना आकाश निरभ्र होते, ढगांचे प्रमाण कमी होते आणि सूर्यप्रकाश वाढतो. त्यामुळे तापमानात वाढ होऊन ‘ऑक्टोबर हीट’सारखी परिस्थिती निर्माण होते. मात्र, यावरून आगामी हिवाळा कसा असेल याचा निष्कर्ष काढणे अद्याप लवकर असल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. हिवाळ्याचे अधिक स्पष्ट चित्र नोव्हेंबर महिन्यात समोर येण्याची शक्यता आहे.