वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण! आरोपी बंडू फाटक यांची निर्दोष सुटका, कोर्टात काय घडलं?

वैष्णवीने वयाच्या 24 वर्षी जीवन संपवल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून तिचा खून झाल्याचा आरोप केला होता.

Agwane Case

पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात (Pune) आरोपी बंडू फाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे यांना पवना डॅम परिसरातील फार्महाऊसवर आश्रय दिल्याचा आरोप फाटक यांच्यावर करण्यात आला होता. मात्र, या आरोपांच्या आधारे त्यांच्यावर आश्रय दिल्याचा गुन्हा सिद्ध होत नसल्याचं निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने त्यांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे.

पुणे सत्र न्यायालयाने बंडू फाटक यांचा खटल्यातून डिस्चार्ज मिळावा यासाठी दाखल केलेला अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान फाटक यांच्या वतीने वकील प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. केवळ एखाद्या व्यक्तीला जेवण किंवा राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे म्हणजे त्याला कायद्याच्या अर्थाने आश्रय देणं ठरत नाही, असा बचाव पक्षाचा युक्तिवाद होता.

धक्कादायक! डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचा मृत्यू, काय घडलं?

एखाद्या आरोपीने गुन्हा केल्याची माहिती असूनही त्याला कायदेशीर कारवाईपासून वाचवण्याच्या उद्देशाने लपवून ठेवलं असल्याचं स्पष्ट होणं आवश्यक आहे, असा मुद्दाही बचाव पक्षाने मांडला. केवळ आरोपीशी संपर्क किंवा त्याला राहण्याची सुविधा मिळाल्याच्या आधारावर आश्रय दिल्याचा गुन्हा ठरू शकत नाही, अशी भूमिका घेण्यात आली. या युक्तिवादाची दखल घेत उच्च न्यायालयाने बंडू फाटक यांना या आरोपातून दिलासा दिला.

वैष्णवी हगवणे हिच्या मृत्यूनंतर हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. सासरच्या मंडळींकडून हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला होता. तिच्या लग्नावेळी माहेरच्या कुटुंबाने 51तोळे सोने, फॉर्च्युनर कार आणि चांदीची भांडी दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतरही पैशांच्या मागणीवरून तिचा छळ सुरू असल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं होतं. वैष्णवीने वयाच्या 24 वर्षी जीवन संपवल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी हा आत्महत्येचा प्रकार नसून तिचा खून झाल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणात राजेंद्र हगवणे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह अन्य आरोपींवर हुंडाबळी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपांखाली कारवाई करण्यात आली. प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने 22 मे 2025 रोजी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. आता बंडू फाटक यांना उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या दिलाशामुळे या प्रकरणातील न्यायालयीन घडामोडींना नवं वळण मिळालं आहे.

follow us