Download App

तुमच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला ? संजय राऊतांच्या राज ठाकरेंवर घणाघात

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Raj Thackeray : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसेमध्ये (MNS) राजीनामा देण्याचे सत्र सुरु झाले आहे. मनसे सरचिटणीस किर्तीकुमार शिंदे (Kirtikumar Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंवर विरोधक चौफेर टीका करत आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज माध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तुमच्या पक्षाचा नमो निर्माण पक्ष का झाला ? असा खोचक सवाल देखील राऊत यांनी विचारला.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निर्माण झालेला पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठिंबा देत आहे. यामुळे लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की, तुमच्या पक्षाचा नमोनिर्माण पक्ष का झाला ? याचं उत्तर राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आज राज्यातील ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी व व्यभिचारी यांना भाजपने आपल्याकडे घेतले आहे. त्यापैकी हे एक महाशय आहेत का? मला असं वाटत नाही. या व्यभिचारी व्यासपीठावर राज ठाकरे यांनी पाय ठेवला असेल तर त्यांना उत्तर द्यावे लागेल असं राऊत यावेळी म्हणाले.

महायुतीमधील नेत्यांवर टीका करत अजित पवार, हसन मुश्रीफ अशी अनेक नावे आहेत ज्यांनी बिनशर्त भाजपसोबत जायचे मान्य केले. ते का गेले? कोणाच्या दबावामुळे गेले? हे सर्वांना माहीत आहे. मात्र राज ठाकरे यांनी देखील याच कारणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकसभा निवडणुकीसाठी बिनशर्त पाठिंबा दिला असेल असं मला वाटत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत संजय राऊत यांनी गेल्या काही दिवसांपासून राज्यात जी लूट सुरु आहे, जे खोक्याचे घाणेरडे राजकारण सुरू आहे त्याचे सूत्रधार नरेंद्र मोदी आणि अमित शहा असल्याचं म्हटलं आहे. आम्ही महाराष्ट्राच्या अस्मिता आणि स्वाभिमानासाठी लढत आहोत. आम्ही मोदी आणि शहा विरोधात लढत आहोत. स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही भाजपसाबोत कधीही राहिलो नाही. जेव्हा भाजपने खरे दात दाखवायला सुरुवात केली तेव्हा आम्ही तो जबडा फाडून बाहेर आलो आणि आम्ही स्वतंत्रपणे भूमिका घेतल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

जर कुणी महाराष्ट्रावर घाव घालत असेल तर…

संजय राऊत म्हणाले, आमची महाराष्ट्रासंदर्भात भूमिका अगदी स्पष्ट आहे जर कुणी महाराष्ट्रावर घाव घालत असेल किंवा आमच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचवत असेल तर आम्ही एकत्र येऊ असं म्हणतं त्यांनी आगामी काळात राज्यात संभाव्य राजकीय घडामोडींकडे इशारा केला आहे.

त्यांना कुणी झुकवू शकत नाही…

ठाकरे हे असे नाव आहे त्यांना कुणी झुकवू शकत नाही. आमचे नेते उद्धव ठाकरे यांना देखील झुकविण्याचा प्रयत्न झाला मात्र ते झुकले नाहीत. आम्ही सर्व बाळासाहेबांचे शिलेदार आहोत. आम्हाला तोडण्याचा प्रयत्न झाला मात्र आम्ही तुटलो नाही. आम्ही त्यांच्या विरोधात लढतो आहोत. महाराष्ट्राला लढणाऱ्यांची गरज आहे. राज ठाकरे यांनी हा निर्णय महाराष्ट्राच्या हितासाठी घेतला असं आम्हाला दिसत नाही. महाराष्ट्राच्या हिताचा प्रश्न असता तर कोणताही नेता अमित शहा आणि मोदींविरोधात ठाम उभा राहील पण असे दिसत नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

तर संजय राऊत यांनी आज सांगलीच्या मतदारसंघात सुरु असणाऱ्या राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केले. विशाल पाटील या मतरदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत यावर बोलताना राऊत म्हणाले, विशाल पाटील हे वसंत पाटील यांच्या कुटुंबातील आहेत. वसंत पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील पितामह आहेत. विशाल पाटील यांनी 2019 मध्ये उभे होते परंतु ते पडले. आता ते परत अशी चूक करतील असे वाटत नाही.

follow us