Download App

राज्यसभा, ईडी चौकशी की झिशानचे फ्युचर? बाबा सिद्दकींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे काय कारण?

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर मुंबईत काँग्रेसला (Congress) आणखी एक मोठा हादरा बसला आहे. ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddiqui) यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. आज (8 फेब्रुवारी) त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 10 फेब्रुवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचवेळी, त्यांचे पुत्र आणि वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दकी हे काँग्रेस सोडायची की पक्षातच राहायचा याबाबतचा निर्णय स्वतः घेतली असेही बाबा सिद्दकी यांनी स्पष्ट केले. (Senior leader Baba Siddiqui decided to leave Congress but why?)

दरम्यान, सिद्दकी यांच्या रुपाने काँग्रेसला जरी मोठा हादरा बसला असला तरी सिद्दकी यांच्या रुपाने अजित पवार यांच्या गटाला मुंबईत मोठा मुस्लीम चेहरा मिळणार आहे. सध्या अजित पवार यांच्याकडे कोणताही मुस्लीम चेहरा नाही. मध्यंतरी नवाब मलिक यांना आपल्याकडे घेण्याचा अजित पवार यांनी प्रयत्न केला होता. मात्र त्यांच्यावरील आरोपांमुळे ते आपल्यासोबत नकोत अशी भूमिका भाजपने घेतली आणि नाईलाजास्तव अजित पवार यांनाही ती भूमिका मान्य करावी लागली. त्यानंतर आता सिद्दकी यांच्यारुपाने अजितदादांकडे मुंबईत एक मोठा मुस्लीम चेहरा येणार आहे.

Baba Siddiqui: सलमान- शाहरुखचा वाद सोडवणारा बाबा सिद्दीकी आहे तरी कोण?

एका बाजूला एका पक्षाला फायदा आणि दुसऱ्या पक्षाला तोटा होणार असल्याचे दिसत असले तरी सिद्दकी यांनी 48 वर्षांपासूनचे संबंध तोडत काँग्रेस सोडायचा निर्णय का घेतला? असा सवाल सध्या विचारला जात आहे. कारण सिद्दकी यांना काँंग्रेस पक्षाने चारवेळा विधानसभेचे तिकीट दिले होते. यातील तीनवेळा ते निवडूनही आले होते, याशिवाय त्यांनी बरीच वर्षे मंत्री म्हणूनही काम केले आहे. आता त्यांचे पुत्र झिशान सिद्दकी हे वांद्रे पूर्वमधून आमदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या दारातील हा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. इथून सिद्दकी यांनी निवडून येण्याची किमया साधली होती. त्यावरुन त्यांची वांद्रे भागात किती ताकद आहे याचा अंदाज बांधता येतो. त्यानंतरही त्यांनी काँग्रेस का सोडली असा सवाल विचारला जात आहे.

यात प्रामुख्याने चार कारणे असल्याचे बोलले जात आहे :

यातील पहिले तर राज्यसभा : 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकीसाठी एक उमेदवार राहणार आहे. याठिकाणी बाबा सिद्दकी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. एक तर मुंबईतील मुस्लीम चेहरा, दुसरी गोष्ट म्हणून अनुभवी नेता आणि तिसरी गोष्ट म्हणून आर्थिकदृष्टी सक्षम म्हणून सिद्दकी यांना ओळखले जाते. अनेकदा राजकीय पक्ष राज्यसभेच्या उमेदवारीचा वापर पक्षनिधी करत असल्याचे दिसून येते. यातूनच यापूर्वी अनेक उद्योगपती राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. गतवेळी देखील देवरा आणि सिद्दकी राज्यसभेसाठी इच्छुक होते. मात्र दोघांना डावलून इम्रान प्रतापगढी यांना उमेदवारी देण्यात आली. या समीकरणांमुळे सिद्दकी आगामी राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार असू शकतात अशी शक्यता आहे. मात्र आपल्याला अजितदादांकडून राज्यसभेची ऑफर नाही असे म्हणत सिद्दकी यांनीच या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

500 कोटींच्या घोटाळ्यात ईडी चौकशी :

बाबा सिद्दकी यांच्याभोवती सध्या ईडीचा फास आहे. मागील जवळपास सात वर्षांपासून 500 कोटींच्या एसआरए घोटाळ्यात त्यांची ईडी चौकशी सुरु आहे. 2017 मध्ये त्यांची याबाबत चौकशीही झाली होती. हेच प्रकरण पुन्हा ताजे झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाईपासून वाचण्यासाठीच सिद्दकी यांनी भेट भाजप नको म्हणून अजितदादांच्या राष्ट्रवादीचा मार्ग निवडला असावा असे बोलले जात आहे. राज्यातील काही नेत्यांना ईडीचे समन्स आले आहे. हे नेते चौकशीच्या फेऱ्यात आहे. हे सर्व नेते त्यांना संरक्षण मिळेल, त्या पक्षात जात आहेत, असे म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही याबाबत भाष्य केले होते.

मुंबईत काँग्रेसला आणखी एक मोठा हादरा : देवरांपाठोपाठ बाबा सिद्दीकीही सोडणार ‘हात’

झिशान सिद्दकी यांचे सेफ फ्युचर :

बाबा सिद्दकी यांना आपला मुलगा झिशान यांना दुसऱ्यांदा निवडून आणायचे आहे. पण ते ज्या मतदारसंघातून निवडून येतात तो वांद्रे पूर्व मतदारसंघ शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये हवा आहे. शिवाय सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये काँग्रेसने हा मतदारसंघ ठाकरे गटाला न सोडल्यास आणि ठाकरे गटाने झिशान यांना मदत न केल्यास त्यांचे निवडून येणे काहीसे अवघड मानले जाते. त्यामुळेच महायुतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घेऊन झिशानला इथून निवडून आणता येऊ शकेल असे आडाखे बाबा सिद्दकी यांनी मांडले असावे असे बोलले जात आहे.

सिद्दकींचे स्वतःते अस्तित्व :

मुंबई काँग्रेसमध्ये काही दिवसांपर्यंत सुनील दत्त, एकनाथ गायकवाड, गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांचे पारंपारिक चार गट होते. बाबा सिद्दकी हे सुनील दत्त यांच्या गटातील मानले जात होते. सध्या दत्त आणि कामत यांचा यांचा गट अस्तित्वात नाही. देवरा शिवसेनेत आहेत. त्यामुळे गायकवाड यांचा गट काँग्रेसमध्ये सक्रिय आहे. यामुळेच आपले राजकीय अस्तित्व पुन्हा दाखवून देण्यासाठी सिद्दकी यांनी अजित पवार यांच्या गटाचा मार्ग निवडला असावा. आगामी निवडणुकीत अजित पवार यांच्या गटाचा चेहरा होऊन ते आपले राजकीय अस्तित्व दाखवून देऊ शकतात. यातूनच कदाचित त्यांची राज्यसभेवरही वर्णी लावली जाऊ शकते.

follow us