Download App

मनसे ते भारत राष्ट्र समिती व्हाया शिवसेना; हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय प्रवास कसा?

  • Written By: Last Updated:

केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षात प्रवेश केला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी हैद्राबाद येथे जाऊन तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. लवकरच चंद्रशेखर राव यांची छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा घेणार असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले आहे.

हर्षवर्धन जाधव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. २००९ साली त्यांनी कन्नडमधून मनसेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती व ते आमदार झाले होते. आता ते भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश करत आहेत. पण मागच्या काही दिवसापासून सतत वादग्रस्त ठरत असलेल्या हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय प्रवास कसा आहे, हे आपण पाहून घेऊ.

सुजय विखेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, आम्ही डाकू आहोत का ?

राजकीय वारसा

हर्षवर्धन जाधव यांना राजकीय वारसा घरातूनच मिळालेला आहे. त्याचे वडील रायभान जाधव हे प्रशासकीय अधिकारी होते. काही काळ ते मुख्यमंत्री शंकरराव जाधव यांचे स्वीय सहाय्यकही होते. प्रशासन सोडून ते राजकारणात आले. जिल्हा परिषद निवडणूक लढवली, एकदा पराभव झाल्यानंतर ते दुसऱ्यांदा निवडून आले.

पुढे ते विधानसभेला निवडून आले. जवळपास साडेबारा वर्षं त्यांनी आमदार म्हणून कन्नड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. १९९७ साली त्यांच निधन झालं. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत रायभान जाधव यांच्या पत्नी जिंकल्या त्या काही काळ आमदार राहिल्या.

जिल्हा परिषद लढवून राजकारणात

वडील आमदार राहिले असले तरी हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात जिल्हा परिषदेच्या राजकारणातून केली. १९९९ साली ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले.  त्याच दरम्यान ते कन्नड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणूनही निवडून आले होते. पुढे २००४ साली त्यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली, पण त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

याच काळात राज ठाकरे यांनी आपल्या नव्या पक्षाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली होती. हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला आणि २००९ ची विधानसभा त्यांनी मनसेच्या तिकिटावर लढवली आणि ते निवडूनही आले. पण २०११ साली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या ताफ्यात गाडी घुसवल्यानंतर त्यांना पोलिसांनी मारहाण केली. त्यावरून मोठा वाद झाला.

मनसेमधून शिवसेनेत

पोलिसांनी मारहाण केल्याचा प्रकरणात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी सहकार्य केले नाही, त्यामुळे नाराज होऊन त्यांनी मनसेला राम राम ठोकला आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. पण ते शिवसेनेमधेही जास्त काळ टिकू शकले नाही.

जाधव यांनी २०१४ ची विधानसभा शिवसेनेच्या तिकिटावर लढवली. ते आमदार म्हणून निवडून आले. पण औरंगाबादचं सेनेचं राजकारण चंद्रकांत खैरे यांच्या हातात होत, त्यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. यातूनच वाद निर्माण होऊ लागले. त्यातच या काळात राज्यभर मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरु झाले होते. जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देत नव्या पक्षाची स्थापना केली.

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

शिवसेनेची साथ सोडल्यानंतर त्यांनी स्वत:चा शिवस्वराज्य बहुजन पक्ष स्थापन केला होता. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पण त्याच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतरची विधानसभा त्यांनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाच्या तिकिटावर लढवली. पण त्यांना तिथेही पराभव स्वीकारावा लागला.

राजकारणातून संन्यासाची घोषणा, पण…

२०१९ साली आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा असे सलग दोन पराभव जाधव याना स्वीकारावे लागले. त्यानंतर पुन्हा त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. त्यांना मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष पद देण्यात आले. पण तिथेही त्यांनी जास्त काळ काम केलं नाही. काही दिवसातच त्यांनी आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पब्लिश करून राजकीय संन्यास घेणार असल्याची घोषणा केली आणि आपल्या पत्नीला राजकीय वारसदार म्हणून घोषित केलं. पण त्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी आणि सासरे रावसाहेब दानवे यांच्यावर आरोप केले.

दरम्यान मागील काही काळात ते इतर काही वादामुळे चर्चेत आले होते. पण आता पुन्हा त्यांनी नव्या राजकीय पक्षात प्रवेश केला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस यांच्या पक्षात प्रवेश केला आहे.तर दुसरीकडे त्यांची पत्नी देखील यावेळी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे या निडवणुकीत पती  विरुद्ध पत्नी असाही नवा सामना रंगेल असंही काही लोंकाना वाटतं.पण याही पक्षात ते किती काळ टिकतात हे पाहावं लागेल.

ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?

Tags

follow us