ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?

ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि 2019 मध्ये राज्यात न भूतो न भविष्यती अस प्रयोग राज्यात घडला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षे सत्तेत राहिले त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चाळीस आमदारांना बरोबर घेत बंड केले. त्यामुळे सरकारला पायउतार व्हावे लागले. या सगळ्या राजकारणात कधीकाळी सोबत असणारे दोन दिग्गज नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात दुरावा निर्माण झाला. दोन्हीही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसत.

त्यानंतर आज मात्र विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने हे दोघेजण चक्क हसत, गप्पा मारत विधानभवनाकडे जाताना पाहिले गेले. या प्रकाराने तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सोशल मिडीयावरही या घटनेचे फोटो व्हिडीओ व्हायरल होऊ लागले. त्यानंतर पत्रकारांनीही त्यांना गाठले.

Devendra Fadnavis मनसोक्त गप्पात हरवले, ताज हॉटेलात रंगली कष्टकऱ्यांसोबत मैफील

विधिमंडळाबाहेर उद्धव ठाकरे यांना या सगळ्या घडामोडीबाबत विचारले. ठाकरे फडणवीस एकत्र येताच नव्या युतीचे संकेत आहेत का असा थेट प्रश्न पत्रकारांनी केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आम्ही दोघे एकत्र प्रवेश करत असल्याने एकमेकांना अभिवादन केले. कोणाला हाय, हॅलो म्हणणंही आता पाप झालं आहे का ?’, ‘हेतुपुरस्सरच अशा गोष्टी कराव्यात का’, असे प्रश्न ठाकरे यांनी उपस्थित केले.

फडणवीसांची भेट योगायोग होता का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर ठाकरे म्हणाले, ‘आधी जास्त खुलेपणा होता. आता बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी होते असं म्हणतात. जेव्हा आमची कदाचित किंवा कधीतरी बंद दाराआड चर्चा झाली तर बोलू’, असे उत्तर त्यांनी दिले.

वाचा : Uddhav Thackeray यांचा गौप्यस्फोट : शिंदेंच्या बंडाबाबत आधीच कल्पना होती!

एकूणच दोघांच्या या भेटीने पुन्हा युती होईल का अशी चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे. युती होईल किंवा नाही हे अद्याप सांगता येणे अशक्य आहे. मात्र, दोन्ही नेत्यांच्या या काही क्षणाच्या भेटीने वेगळेच संकेत दिले आहेत. याआधी भाजप शिवसेना युती होती. 2014 मध्ये युतीचे सरकार होते. त्यानंतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढल्या. निवडणुकीत यशही मिळाले.

त्यानंतर मात्र मुख्यमंत्रीपदाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांतील युती तुटली. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर विश्वासघाताचे आरोप केले जाऊ लागले. यामध्ये उद्धव ठाकरे आणि फडणवीस आघाडीवर होते.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री बनले. यानंतर फडणवीस आणि ठाकरे यांच्यातील दुरावा वाढला होता. या सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये फडणवीस उपमुख्यमंत्री बनले. त्यानंतर या दोघांतील दुरावा जास्तच वाढला होता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे प्रमाणही वाढले होते.

Devendra Fadnavis : गिरीश महाजन, गुलाबरावांनी त्रास देऊ नये म्हणून माझं खडसेंवर लक्ष

हिंदुत्व, भ्रष्टाचार, करोनाचे संकट, तिन्ही पक्षांतील निधी वाटप, सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचार यांसारख्या अनेक मुद्द्यांवर फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार केले. सरकार पाडण्यात त्यांचीच महत्वाची भूमिका असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होताच. उद्धव ठाकरेंनाही ती सल मनात होतीच. कशा पद्धतीने शिवसेना फोडून भाजपने सत्ता मिळवली याची अनेक उदाहरणे देत ठाकरे व त्यांच्या गटातील नेते शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका करत होते.

हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा खेळ सारखा सुरू असताना आज विधिमंडळ अधिवेशनाच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनंतर फडणवीस आणि ठाकरे एकत्र येताना दिसले. त्यामुळे राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटल्या.

वाईट नाही हे तर पुण्याचं काम – राणे  

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीची आज राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. ही भेट झाल्याने जुने मित्र पुन्हा एकत्र येणार का, युती होणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या भेटीवर प्रसारमाध्यमांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्याशी संवाद साधला. यावर राणे यांनी मात्र खोचक प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, विधानभवनात येण्यासाठी एकच गेट आहे. सगळे जण तेथूनच येतात आणि माणूस आजारी आहे. तेव्हा देवेंद्रजींनी थोडी साथ दिली असेल की बाबा चल. तर त्यात वाईट काही नाही. पुण्याचं काम आहे ते. अशा शब्दांत राणे यांनी फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत भाष्य केले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube