Uddhav Thackeray Group Criticized Mahayuti Over RSS Bhaiyyaji Joshi : राज्यात सध्या मराठी विरूद्ध गुजराती असा वाद पेटलेला दिसत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) पदाधिकारी भय्याजी जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने वातावरण तापलेलं आहे. उद्धव ठाकरे पक्ष (Uddhav Thackeray) त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असल्याचं समोर येतंय. मुंबईत राहणाऱ्याला मराठी भाषा आलीच पाहिजे असं नाही, अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी भय्याजी जोशी यांनी मांडली. याचे पडसाद थेट विधानपरिषदेत उमटल्याचं समोर आलंय.
आज विधानपरिषदेत ठाकरे गटाने या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडल्याचं समोर (Mumbai VS Gujrathi) आलंय. याप्रकरणी बोलताना आमदार अनिल परब म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मुंबईचे तुकडे पाडण्याचा डाव आखला जातोय. मुंबईला गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कट रचला जातोय. भय्याजी जोशींचा सरकारने निषेध केला पाहिजे, अशी अनिल परब यांनी मागणी केलीय.
कणकवलीच्या भालचंद्र महाराजांची गाथा आता रुपेरी पडद्यावर येणार, निर्माते हरेश आईर यांची घोषणा
मुंबईतील उद्योग गुजरातला पळवलेच आहेत. आता मुंबईचे तुकडे पाडण्याचा कट असून त्यांची भाषा गुजराती असल्याचं त्यांनी म्हटलंय. घाटकोपरमध्ये मराठी किंवा इतर भाषेचे लोक राहत नाही का? मुंबईत मात्र वेगळ्याच प्रकारचं स्तोम माजवलं जातंय. त्याचा निषेध देखील कुणी करत नाही. भय्याजी जोशी यांनी मुंबईची माफी मागायला हवी. आम्ही मराठी भाषेवरील अन्याय सहन करणार नाही, असं अनिल परब यांनी म्हटलंय.
मुंबईत येणाऱ्या लोकांना मराठी भाषा समजली पाहिजे, किमान त्या लोकांनी मराठी भाषा बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मराठी माणसाला डावलून गुजराती मतं मिळविण्यासाठी मुंबईचं गुजरातीकरण केलं जातंय, असा इशारा देखील परब यांनी दिलाय. तर विरोधकांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती राम शिंदे यांनी फेटाळून लावलाय. त्यामुळे विरोधकांनी गोंधळ केला. तेव्हा सभागृहाचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं.
विद्याविहार येथील एका कार्यक्रमात भय्याजी जोशी म्हणाले की, मुंबईची कोणतीही एक भाषा नाही, तर अनेक भाषा आहेत. वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी भाषा असते. जशी घाटकोपर ची भाषा गुजराती आहे. तसेच तुम्हाला गिरगावात हिंदी बोलणारे कमी आणि मराठी भाषा बोलणारे जास्त लोक दिसतील. मुंबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मराठी शिकलंच पाहिजे, असं काही नाहीये. मुंबई अन् महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठीच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आम्ही प्रत्येक भाषेचा सन्मान करतो. परंतु मराठीला डावलता कामा नये, असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलंय.