Maharashtra Politics : अजित पवार राज्य सरकारमध्ये होऊन आता अडीच महिने उलटून गेले आहेत. सरकारकडे बहुमत असतानाही अजित पवार (Ajit Pawar) यांना सरकारमध्ये का घेतले?, त्यांना सोबत घेण्याचा निर्णय कुणाचा होता?, असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. या प्रश्नांचं उत्तर माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी देत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. शिंदे गटाचे बुलढाणा जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक खोतकर यांनी आज लोणार बाजार समितीत आढावा बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी या राजकारणाचा मोठा खुलासा केला. आगामी निवडणुकांचा विचार करता कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत असे खोतकर म्हणाले.
सरकार पलटवलं अन् राज्य नंबर वन केलं; अजितदादांसमोरच शिंदेंकडून ठाकरे सरकारचा पंचनामा
ते पुढे म्हणाले, अनैसर्गिक महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत युती केली. मात्र, भाजपने गरज म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेतले. या निर्णयाचा आणि शिवसेनेचा काहीच संबंध नाही, असे खोतकर म्हणाले. आगामी काळातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही त्यांनी महत्वाची माहिती दिली. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू आहे. दीर्घकाळ रखडलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेच्या निवडणुकाही लवकरच घेण्यात येणार असल्याचे खोतकर यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राजकीय पक्षांनी या निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. अजित पवारही मैदानात उतरले आहेत. काल छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी पक्ष कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मराठवाड्यात आपल्याला खासदारांची संख्या वाढवायची आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादीच्या विचारांच्या आमदारांची संख्या वाढवायची आहे. आधी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तुमची काय ताकद आहे ते मला या निवडणुकीत कळेल. कुठल्या मतदारसंघात आपण महायुतीचे उमेदवार देणार आहोत ते लवकरच कळेल. परंतु, जमिनीवर पाय ठेऊन लोकांत मिसळले पाहिजे अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या.