Download App

Sanjay Raut : ‘तीन घाशीराम सरकार चालवतात, भाजपाकडे नैतिकताच नाही’; राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut : नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केला. अजित पवार यांनी पत्र लिहून तसं सांगूनही टाकलं. यानंतर राजकारणात सुरू झालेला वाद अजूनही कायम आहे. त्यात आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उडी घेत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपकडे नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. भाजपाच्या नैतिकतेचं ऑडिट होणं गरजेचं आहे, अशी टीका राऊत यांनी केली. दरम्यान, फडणवीस यांनी मोदी शहांना एक पत्र लिहून पटेलांना भेटणे देखील हिताचे नाही. नैतिकतेत ते बसत नाही. साहेब, पटेलांना लांब ठेवा, असे सांगण्याचे धाडस दाखवावे. तरच मलिकांच्या बाबतीत त्यांच्या नैतिकतेच्या उचक्या खऱ्या. नाहीतर पैशांचं सोंग आणि भाजपाच्या नैतिकतेचं ढोंग सारखंच. त्यांच्या नैतिकतेचे ऑडिट करावेच लागेल, अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली होती.

ड्रग्स प्रकरणात सरकारमधील दोन मंत्री 

नवाब मलिक यांना अजित पवार गटात घेतलं जाऊ नये अशी भाजपाची भूमिका आहे. तसं पत्रही फडणवीसांनी लिहिलं आहे. या प्रकारावरून राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत भाजपाच्या कारभारावर टीका केली. ड्रग्स प्रकरणात राज्यातील दोन मंत्री सहभागी आहेत त्यांच्यावर कारवाई केली का, नवाब मलिक चालत नाहीत मग पटेल कसे चालतात, असे टोचणारे सवाल राऊत यांनी केले. नवाब मलिक यांच्यावर जे आरोप आहेत तसेच आरोप पटेल यांच्यावरही आहेत. मग असे असताना फडणवीसांनी त्यांना का पत्र लिहिलं नाही, असा सवाल राऊत यांनी केला. भाजपाकडे आज नैतिकता औषधालाही शिल्लक राहिलेली नाही. त्यांच्या नैतिकतेचं ऑडिट केलंच पाहिजे, ते फक्त ढोंग करत आहेत, असेही राऊत म्हणाले.

Sanjay Raut : सिंचन घोटाळा फेम अजित पवारांना.. ‘त्या’ पत्रावरून राऊतांचा खोचक टोला

मलिक नाही तर मग पटेल कसे चालतात ?

नवाब मलिक यांना वेगळा न्याय आणि इतर नेत्यांना वेगळा न्याय आहे का. मलिक चालत नाहीत मग प्रफुल पटेल कसे चालतात. मोदी-शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसतात अशी टीका संजय राऊत यांनी केली.

आज घाशीराम कोतवालांचंच राज्य 

राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार आणि फडणवीस यांच्यावर राऊतांनी खोचक टीका केली. राज्यावर तीन घाशीराम कोतवालांचं राज्य आहे. पेशवे काळात घाशीराम कोतवालवार पुण्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी होती. मात्र तो लूटमार करायचा. अनागोंदी माजली होती. तशीच परिस्थिती आणि राज्य कारभार सध्या सुरू आहे. पुण्यात पेशवेकाळात घाशीराम कोतवाल होता. आताही तीन घाशीराम कोतवाल राज्य चालवत आहेत. त्यांना कुठली नैतिकता आहे. घाशीराम कोतवालाचा कार्यकाळ पाहा. त्याच्या काळात लूटमार, दरोडेखोरी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सगळीच अनागोंदी होती. घाशीराम कोतवाल ही एक विकृती आहे. आज घाशीराम कोतवालांचंच राज्य आहे.

Tags

follow us