Devendra Fadnavis : लोकसभा की विधानसभा? फडणवीसांचं उत्तर अन् पिक्चर क्लिअर!
Devendra Fadnavis : राज्यात लोकसभा आणि (Lok Sabha Election) त्यापाठोपाठ होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. राजकीय पक्षांकडून मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. उमेदवारांवरही चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर आता जागावाटपाचीही चर्चा सुरू होणार आहे. कोण कुठून लढणार याबाबत अद्याप काहीही स्पष्ट नसले तरी दबावाचं राजकारण सुरू झालं आहे. लोकसभा निवडणूक लढणार की विधानसभा या प्रश्नाचं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता फडणवीस दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत आणि राज्यातच विधानसभा निवडणूक लढतील हे स्पष्ट होत आहे.
मागील काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस केंद्राच्या राजकारणात जातील तसेच लोकसभा निवडणूकही लढतील. मात्र, फडणवीस यांनी या चर्चांना कधीच दुजोरा दिला नाही. आताही त्यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी विधानसभेचीच निवडणूक लढणार आणि ती सुद्धा नागपूरमधूनच. दहा वर्षांनंतर देखील मी भाजपमध्येच काम करेल आणि पक्ष सांगेल तिकडं काम करेल.
Devendra Fadnavis : फडणवीस CM, त्यात चुकीचं काय? शिंदे गटाच्या आमदाराचं वक्तव्य
अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करणार
नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी निवडणूक लढण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर उत्तर दिलं. पुढील दहा वर्षात तुम्ही स्वतःला कुठे पाहता असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर फडणवीसांनी मी भाजपासोबतच राहिल आणि पक्ष देईल ती कोणतीही जबाबदारी मी पार पाडेल. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
CM शिंदेंनी मराठा आरक्षणाचा शब्द दिलाय
राज्यातील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. सध्या मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून ते विविध ठिकाणी भेटी देत आहेत. त्यांच्या जाहीर सभाही होत आहेत. राज्य सरकारने 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं अशी मागणी जरांगे पाटील या सभांतून करत आहेत. या सर्वात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी त्यांनी घ्यावी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणाचा शब्द दिलाय आणि ते हा शब्द पाळत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.