Download App

भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, CM शिंदेंचे आमदार आक्रमक; महायुतीत धुसफूस

Maratha Reservation : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. मराठा आरक्षणासाठी राज्य (Maratha Reservation) सरकार कटिबद्ध असल्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिला होता. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध करत आहेत. या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकांमुळे महायुतीत धुसफूस वाढू लागली आहे. भुजबळांची भूमिका भाजप आणि शिंदे गटाला अडचणीची ठरू लागली आहे. याचाच परिणाम म्हणून आता सत्ताधारी गटातूनही भुजबळांविरोधात आवाज उठू लागला आहे. शिंदे गटातील आमदारांनी छगन भुजबळांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

Chhagan Bhujbal : ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या!’ भुजबळांचा जरांगेंना स्पष्ट इशारा

शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भुजबळांवर टीका केली. छगन भुजबळ मराठा समाजाविषयी तिरस्काराची भावना ठेऊन बोलत आहेत. हे योग्य नाही, अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेऊ नये. त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी गायकवाड यांनी केली. मागील सत्तर वर्षांच्या काळात समाजाच्या नोंदी दाबून ठेवण्यात आल्या त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले. आता या नोंदी मिळायला लागल्या आहेत त्यामुळे प्रमाणपत्र देण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. भुजबळ आता जी भूमिका घेत आहेत ती सरकारची किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नाही. त्यांच्या एका मंत्रिपदाने सरकारला काहीच फरक पडत नाही, असेही गायकवाड म्हणाले.

यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आमदार गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांचे वक्तव्य वैयक्तिक असलं तरी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा वेगळा आहे. काही लोक फक्त राजकारण करण्यासाठी एखाद्या समाजाचा ढाल म्हणून वापर करत आहेत. या अशा राजकारणामुळे दोन्ही समाजात चुकीचा संदेश मात्र जात आहे. पत्रकार परिषदा घेऊन जर सरकारवरच आरोप केले जात असतील तर त्यांचा राजीनामा मागून काहीही चुकीचं झालेलं नाही, असे शिरसाट म्हणाले.

शिंदे गट कोणत्या चिन्हावर लढणार? संजय शिरसाटांनी कन्फ्यूजन केलं दूर

 

follow us