Download App

पाच हजार पुरावे मिळाले, समितीचं काम बंद करून आरक्षण द्या; जरांगे पाटलांनी ठणकावलं !

Maratha Reservation : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आतंरवाली सराटी गावात जाहीर सभा होत आहे. लाखोंच्या संख्येने समाजबांधव या सभेसाठी उपस्थित आहेत. जरांगे पाटील यांनी या सभेत आता दहा दिवसात सरकारने मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलेच पाहिजे असा निर्वाणीचा इशारा दिला. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ वाट पाहू शकणार नाही. पाच हजार पुरावे मिळाले आता समितीचे काम बंद करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला केले. दहा दिवसांनंतर जर आरक्षण दिलं नाही तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचं ते, पण पुढे मात्र सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही जरांगेंनी दिला.

‘जनतेचे पैसे खाल्ले अन् दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले’; जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

जरांगे पाटील यांनी या सभेत मंत्री छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भुजबळ यांनी सभेसाठी होणाऱ्या खर्चावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यालाही जरांगेंनी सडेतोड उत्तर दिले. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही म्हणणारे भुजबळ आता विरोधात बोलत आहेत. ते आता फडफड करत आहेत. सभेला सात कोटी खर्च आल्याचे छगन भुजबळ म्हणाल. मात्र सभेसाठी शंभर एकर जमीन शेतकऱ्याने फुकट दिली. येऊन विचार. असे जरांगे पाटील म्हणाले.

भुजबळ म्हणतात, लोक 10 रुपये देत नाहीत. त्यांना देत नसतील पण आम्हाला देतात. तुम्हाला का पैसे देत नाहीत मी सांगतो. गोरगरीब मराठा जनतेनं तुम्हाला मोठं केलं. त्यांचं रक्त पिऊन तुम्ही पैसा कमावला म्हणून तुमच्यावर धाड पडली. जनतेचे पैसे खाल्ले आणि दोन वर्ष आतून बेसन खाऊन आले आणि आम्हाला शिकवतात. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे ते समजले पाहिजे. अजित पवार यांनी त्यांनी समज द्यावी अशी विनंती त्यांनी भुजबळांचे नाव न घेता केली.

CM शिंदे अन् पवार-फडणवीसांनी मराठ्यांना उचकवायला लावलं! जरांगेचा सर्वात मोठा आरोप

मराठा समाज दिलेला शब्द कधीच मोडत नाही. सभेसाठी समाज शांततेत आला आणि शांततेतच जाणार. पोलीस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आपण त्यांना सहकार्य करावे, असे आवाहनही जरांगे पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. यानंतर त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही घणाघाती टीका केली. सरकारकडे दहा दिवस आहेत. तेव्हा आता सरकारने आरक्षण दिलेच पाहिजे, असेही जरांगे पाटील म्हणाले.

Tags

follow us