Download App

विद्यार्थी आंदोलन ते केंद्रीय मंत्री : जेष्ठ नेते शरद यादव यांचे निधन

  • Written By: Last Updated:

नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) ज्येष्ठ नेते शरद यादव यांचे आज निधन झाले. ७५ वर्षीय शरद यादव यांना गुडगावमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरद यादव यांची मुलगी सुभाषिनी यांनी शरद यादव यांच्या निधनाची सोशल मीडियावरून दिली.

सुभाषिनी यादव यांनी ट्विटरवर लिहिले की, “पापा राहिले नाहीत.” त्यानंतर फोर्टिस रुग्णालयाने एक निवेदन जाहीर करून त्यांना इमर्जंन्सी मध्ये आणण्यात आले होते. रुग्णालयात आणल्यानंतर ते बेशुद्ध अवस्थेत होते. रात्री 10.19 वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले.

शरद यादव अनेक वर्ष जनता दल युनायटेड ​​(जेडीयू)चे अध्यक्ष होते. 2017 मध्ये पक्षांतर्गत वादामुळे जेडीयूने त्यांना राज्यसभेतील पक्षनेतेपदावरून हटवले होते. यामुळे त्यांनी जेडीयू मधून बाहेर पडून 2018 मध्ये स्वतःचा डेमोक्रेटिक जनता दल (LJD) पक्ष स्थापन केला. मात्र गेल्या वर्षी मार्चमध्ये त्यांनी आपला पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) मध्ये विलीन केला.

विद्यार्थी नेता म्हणून राजकारणाला सुरुवात

शरद यादव यांनी दीर्घकाळ दिल्ल्लीत काम केले असले तरी गेल्या तीन दशकापासून त्यांचे राजकारण बिहारमध्येच केंद्रित राहिले आहे. मात्र शरद यादव यांच्या राजकारणाची सुरुवात मध्यप्रदेश मधून झाली आहे. त्यांचा जन्म 1 जुलै 1947 रोजी मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथे झाला. त्यांनी जबलपूर अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेकचे शिक्षण घेतले. स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये त्यांना सुवर्णपदक मिळाले. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना राजकारणातही रस वाढला. महाविद्यालयातच विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

1974 मध्ये जबलपूरमधून लोकसभा पोटनिवडणूक जिंकून शरद यादव पहिल्यांदा खासदार झाले. यावेळी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होते. आणीबाणीच्या काळात मिसाअंतर्गत ते तुरुंगातही गेले होते. 1977 मध्ये ते जबलपूरमधून पुन्हा लोकसभेत पोहोचले. त्यावेळी ते युवा जनता दलाचे अध्यक्षही होते.

जनता पक्ष फुटल्यानंतर ते चरणसिंग यांच्या गटात सामील झाले. 1981 आणि 1984 मध्ये ते अमेठी आणि बदायूंमधून लोकदलाच्या तिकिटावर पराभूत झाले. पण त्यानंतर 1989 मध्ये ते जनता दलाच्या तिकिटावर बदायूमधून लोकसभेत पोहोचले.

त्यानंतर त्यांनी बिहारमधील मधेपुरा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. मधेपुरामधून ते चार वेळा लोकसभेत खासदार म्हणून निवडून गेले. शरद यादव हे जेडीयूच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. नितीश कुमार आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत 1997 मध्ये जेडीयूची स्थापना झाली. त्याच वर्षी लालू यादव यांनी राष्ट्रीय जनता दलाचीही स्थापना केली.

शरद यादव 1999 मध्ये मधेपुरामधून विजयी होऊन लोकसभेत पोहोचले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते नागरी विमान वाहतूक, कामगार खाते आणि ग्राहक व्यवहार या खात्यांचे मंत्री होते. 2004 मध्येही निवडणूक लढवली पण लालू यादव यांच्याकडून पराभव झाला. त्यानंतर त्याच वर्षी ते राज्यसभेवर निवडून गेले. शरद यादव यांनी शेवटची 2019 ची लोकसभा निवडणूक मधेपुरामधून लढवली होती, पण त्यांचा पराभव झाला होता.

Tags

follow us