Video : मी दाव्यांना घाबरत नाही! काय करायचं ते करा, अंधारेंचे निंबाळकरांवर पुन्हा गंभीर आरोप
कालच्या पत्रकार परिषदेनंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर गंभीर आरोप केले.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल फलटण (Phaltan) येथील तरुण डॉक्टर मुलीच्या मृत्यू प्रकरणावर पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर अनेक पुरावे देत थेट घणाघाती आरोप केले. त्यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढवावी अशी मागणी केली आहे. तसंच, काही पुरावे दाखवले आहेत. निंबाळकर यांचीही चौकशी करायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत.
माझ्या बोलण्याला काहीही अधार नाही, असं सांगितले जात आहे. पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्रं लिहिली होती. त्यांनी आरोग्य विभागाचे आपले वरिष्ठ डॉ. अंशुमन धुमाळ पत्र लिहिले होते. खासदारांचे दोन पीए आहेत. एपीआय झायपात्रे, पीएसआय पाटील, अंशुमन धुमाळ, निंबाळकरांचे दोन पीए यांना चौकशीच्या कक्षेत आणावे, अशी माझी मागणी असल्याचे यावेळी अंधारे म्हणाल्या.
डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; शवविच्छेदनाचा अहवाल आला, त्या रात्री काय घडलं
रणजितसिंह निंबाळकर हे आपल्या ताकदीचा वापर करून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत. अनेक गुन्हे रणजितसिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात. त्यांच्या प्रभावाखालीच हे गुन्हे दाखल होतात. वर्षा आणि हर्षा हगवणे प्रकरणातही निंबाळकर यांचा समावेश आहे. वर्षा आणि हर्षा या दोघींनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती असंही त्या म्हणाल्या आहेत.
त्याचबरोबर या सुसाईड नोटमध्ये निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख आहे, असा दावा अंधारे यांनी केला. हा दावा करताना त्यांनी वर्षा आणि हर्षा यांची सुसाईड नोट वाचून दाखवली. तसंच अंधारे यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावरही जोरदार टीका केली. महिला आयोगाला सातारा डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करण्याचा कोणताही अधिकार नाही. महिलांचा एवढाच पुळका आहे तर वर्षा आणि हर्षा यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला आहे.
चाकणकर यांना भाजपात उडी मारायची आहे म्हणून हे सगळं चालू आहे का? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे. निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. यावर बोलताना मी निंबाळकर यांच्या अब्रुनुकसानीच्या दाव्याला घाबरत नाही. मी रोज समोर येणार आणि पुरावे बाहेर काढणार. काय करायचे ते करा? असे थेट आव्हानच दिले आहे. त्यामुळे आता सातारा डॉक्टर महिला प्रकरणात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
