Sunil Tatkare : शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) आव्हान देत बारामती लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याने अजित पवारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवतारे सातत्याने अजित पवारांवर टीका करत आहेत. अशातच आता अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शिवतारेंवर निशाणा साधला आहे. शिवतारे यांची स्किप्ट कुणी लिहिली, याचा शोध सुरू असल्याचं तटकरेंनी सांगितलंय
‘अजितदादांनी खो घातला म्हणूनच..,’; संग्राम थोपटेंचं नाव घेत विजय शिवतारेंचा निशाणा
उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत सामील झाले असले तरी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कायम आहे. शिवतारे अजित पवारांवर कडवट शब्दात टीका करत आहे. याविषयी बोलतांना तटकरे म्हणाले की, अजित पवार हे राष्ट्रवादीचे कणा आहेत. सासवडची जागा कॉंग्रेसची होती, तिथे आघाडीची जागा कॉंग्रेसकडे होती. त्यावेळी शिवतारे शिवतारे शरद पवारांबद्दल चुकीचे बोलले होते, त्यामुळं अजित पवार यांनी विडा उचलला होता. आघाडी आणि राष्ट्रवादी पक्ष वाचवण्यासाठी आम्ही वाईट झालो. इंदापुरामध्येही आमची आघाडी तुटली म्हणून भरणे निवडून आले, असं तटकरे म्हणाले.
विजय शिवतारे यांची स्क्रिप्ट कुणाची आहे, याचा शोध घेतोय. मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. शिवतारेंनी भूमिका मांडली, तशी परांजपे यांनी मांडली. युती याला एकत्रितपणे सामोरे जाईल. शिवतारेंना महत्त्व द्यावे, असे वाटत नसल्याचंही तटकरे म्हणाले. रामराजे, विजयसिंह मोहिते पाटील यांची भेट झाली. सांगलीवरून महाविकास आघाडीत मतभेद पाहायला मिळत असल्याचंही तटकरेंनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. जागावाटपाबाबत बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, दिल्लीत आज एकही बैठक नाही, उद्या-परवा बैठक होईल आणि घटक पक्षांमध्ये जागावाटप होईल. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचारपूर्वक चर्चा सुरू आहे, आम्ही आढावा घेत आहोत. दोन दिवसांत सर्व जागा वाटप होईल, अशी अपेक्षा तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढवणार
बाष्कळपणाने बोलणाऱ्या आव्हाडांनी आम्हाला घड्याळ मिळू नये म्हणून याचिका दाखल केली. घड्याळ चिन्ह रद्द करावे, यासाठी अट्टहास होता. पण, न्यायालयाने त्यांना चपराक दिली. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जाहिरात करण्यास सांगितले, कारण आमचा पराभव होऊ शकतो, असा युक्तिवाद केला. आम्हाला मिळालेलं चिन्ह थांबवाव असं त्यांना वाटत होतं. पण आम्ही जाहिरात देणार आहोत आणि घड्याळ चिन्हाचा वापर करूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असंही तटकरे म्हणाले.