Asaduddin Owaisi : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीनचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी आज ( 09 ऑक्टोबर) अहिल्यानगर शहरात जाहीर सभा घेणार आहे. या सभेसाठी एमआयएमकडून जोरदार तयारी देखील पाहायला मिळत आहे. खासदार ओवैसी यांची अहिल्यानगर शहरात ही पहिलीच सभा असल्याने या सभेच्या माध्यमातून खासदार ओवैसींकडून कोणते मुद्दे उपस्थित केले जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
आगामी महानगरपालिकेची निवडणूक पाहता एमआयएमसाठी ही सभा महत्वाची मानली जात आहे. नगर शहरातील मुकुंदनगर भागातील सीआयव्ही ग्राऊडं येथे संध्याकाळी 6 ते 10 दरम्यान ओवैसी (Asaduddin Owaisi) यांची सभा होणार आहे. या सभेसाठी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यासह, मुंबईचे जिल्हाध्यक्ष फारुक शाब्दीसह (Farooq Shabdi) एमआयएमचे अनेक मोठे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती एमआयएमकडून देण्यात आली आहे.
30 सप्टेंबर रोजी खासदार ओवैसी नगर शहरात सभा घेणार (Asaduddin Owaisi Public Meeting Ahilyanagar) होते मात्र शहरात 29 सप्टेंबर रोजी दोन गटामध्ये मोठा वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी केलेल्या विनंतीवरुन असदुद्दीन ओवैसी यांनी नगर शहरात होणारी सभा रद्द केली होती. तर ही सभा 09 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती एमआयएम प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याकडून पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली होती.
कानपूरमध्ये मोठा स्फोट, मशिदीजवळ उभ्या असलेल्या दोन स्कूटरमध्ये स्फोट; अनेक जण जखमी
तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून नगर शहरात धार्मिक राजकारण वाढल्याने या सभेतून खासदार ओवैसी कोणाला टार्गेट करणार याबाबत सध्या शहरातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तसेच आज असदुद्दीन ओवैसी यांच्या उपस्थितीमध्ये नगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक समद खान यांच्या अनेक कार्यकर्त्ये तसेच काही सामाजिक कार्यकर्ते देखील एमआयएममध्ये जाहीर प्रवेश करणार असल्याने आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एमआयएमकडून कोणती मोठी घोषणा होणार का? याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून आहे.