शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि ठाकरे कुटुंब असा वार सध्या पेटला आहे. (Ramdas Kadam) कदम यांनी नुकत्याच झालेल्या दसरा मेळाव्यात बोलताना थेट ठाकरे कुटुंबावर घणाघाती आरोप केले आहेत. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दोन शब्दांमध्येच रामदास कदम यांचा विषय संपवला आहे.
बाळासाहेबांची बॉडी दोन दिवस का ठेवली? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, मी गद्दार आणि नमकहरामांना उत्तर देत नाही. ठाकरे कोण हे महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे गद्दार आणि हरामखोरांना उत्तर देत नाही, असं म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्या आरोपांवर थेट भाष्य केलं. तसंच, लोकमान्य टिळक प्रश्न विचारू शकतात. तर आपणच निवडून दिलेल्या सरकारला प्रश्न विचारणाचा अधिकार गमावून बसलो आहोत का? असा प्रश्नही ठाकरे यांनी यावेळी केला.
मातोश्री थरथर कापेल! उद्धव ठाकरेंची अन् माझी नार्को टेस्ट करा – रामदास कदमांचा गंभीर दावा
आपण प्रश्न विचारण्याचा अधिकार गमावून बसलो असू तर आपण पत्रकार म्हणून घेऊ शकतो का? हाच एक प्रश्न आहे. त्यामुळे पत्रकारांनी दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं पाहिजे. अंधभक्त जन्माला आले आहेत. त्यांना दृष्टी देण्याचं काम आपण केलं पाहिजे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. राज ठाकरेंसोबत एकत्र येण्याच्या चर्चेवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 2005 पासून आम्ही वेगळे झालो होतो. त्यानंतर एका मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. आणि रोज उठून आम्ही एकत्र आलो.
राज आणि मी एकत्र आलो असं बोलण्याची गरज नाही. 5 जुलैला मेळावा घेतला. एकत्र यायचं नसतं तर मेळाव्यात सोबत आलो नसतो. त्यांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे त्यांचा नख लावण्याचा प्रयत्न आहे असंही ठाकरे यावेळी म्हणाले. त्या दिवशी राज ठाकरे भाषण करत नव्हते. अजून निवडणूक जाहीर झाली नाही. आमच्या दोन तीन भेटी झाल्या आहेत. काही गोष्टी व्यवस्थित होऊ द्या ना, असंही त्यांनी म्हटलं. दसरा मेळाव्याबद्दल बोलताना त्यांनी म्हटले, शिवाजी पार्कात मी भाषण थांबवू का म्हटलं तरी भाषण चालू ठेवा म्हणतात. शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात अधिक आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी शिंदे यांना लगावला.