Video : ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला; उद्धव ठाकरेंनी फुंकलं पालिका निवडणुकीचं रणशिंग
भाषणं सुरु झाल्यावर दरवाजा बंद करण्याची गरज वाटली नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

Uddhav Thackeray Pune Visit : ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज (दि.4) पुण्यात सांगितले. ठाकरे ब्रँड काही आताच जन्माला आलेला नाही. गेल्या पाच ते सहा पिढ्यांपासून महाराष्ट्राला परिचित असलेला हा ब्रँड आहे. हा ब्रँड ज्यांनी खऱ्या अर्थाने नावारूपाला आणला यात माझे आजोबा आणि त्यांच्यानंतर माझे वडील अर्थात हिंदूह्रदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहभाग आहे आणि मी अभिमानाने सांगेल की, त्या ठाकरे ब्रँडचा जन्म पुण्यात झाला आहे. त्यामुळे भाईयो और बहनो आपका और मेरा बहोत पुराना रिश्ता है असे ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्या या विधानामुळे त्यांनी आगामी काळात होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं एकप्रकारे रणशिंग फोडल्याचे मानले जात आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
माझ्या पक्षाचं नाव शिवसेनाच
शिव्या देणाऱ्यांपेक्षा आशीर्वाद देणारे हात महत्त्वाचे आहे. शिवाजी पार्कवर मी भाषण थांबवू का असे विचारले, पण पावसात आणि खाली चिखल असतानाही शिवसैनिकांनी भाषण सुरू ठेवण्याचा आग्रह धरला असे उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या पक्षाचं नाव हे माझ्या आजोबांनी ठेवले आहे. त्यामुळे हे नाव दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नसून, माझ्या पक्षाचं नाव शिवसेना आणि शिवनेसाच राहिल असे ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.
तेव्हा बाळासाहेब शिवाजीपार्कसाठी ठाम राहिले
शिवसेनेचा 1966 मध्ये पहिला दसरा मेळावा झाला. मी 6 वर्षांचा होतो. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवाजी पार्कवर तो घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर काहींनी एवढे मोठे मैदान भरेल का? अशी शंका घेतली. त्यांनी हॉल किंवा दुसऱ्या एखाद्या छोट्या मैदानात सभा घेण्याचा प्रस्ताव ठेवला. पण बाळासाहेबांनी ही सभा शिवाजी पार्कवरच घेण्यावर ठाम राहिले. मी वेडा की लोकं वेडी हे पाहून घेऊ, असे ते तेव्हा म्हणाले होते. आता हे दोघेही वेडे नव्हते हे स्पष्ट झाले आहे. हा प्रवास आजही सुरू आहे. त्यामुळेच पाऊस सुरू असतानाही लोकं जागचे हलले नाही.
भारताला आत्ता खऱ्या पंतप्रधानांची गरज
उपस्थितांशी संवाद साधताना ठाकरेंनी देशातील परिस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले की, आपल्या देशाला सध्या पंतप्रधान, गृहमंत्री व अख्ख्या मंत्रिमंडळाची गरज आहे. कारण, आत्ता जे सत्तेत बसलेत ते केवळ एका पक्षाचे मंत्री आहेत. ते देशाचे नाहीत. यावेळी ठाकरेंनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेवरूनही केंद्राला खडेबोल सुनावले.
त्या कष्टाला आज विषारी फळं लागली
संघाला १०० वर्ष पूर्ण झाली. संघाच्या पिढ्यांनी ज्या खस्ता घातल्या. त्या कष्टाला आज विषारी फळं लागली हे १०० वर्षाचं फलित आहे का? भागवत मशिदीत जातात. सौगात ए मोदी वाटत आहे. तुम्ही सौगात ए नेहरू, सौगात ए इंदिरा गांधी कधी ऐकलं का? सौगात ए मोदीवाले हिंदुत्ववादी कसे? पाकिस्तानसोबत संबंध ठेवू नका हे शिवसेनाप्रमुख म्हणायचे. तेच आम्ही सांगितलं. पहलगाममध्ये धर्म विचारून गोळ्या घातल्या, असं तुम्ही सांगता, मग तुम्ही पाकिस्तानसोबत क्रिकेट कसं खेळता?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.
रामदास कदमांच्या आरोपांवर काय म्हणाले उद्धव ठाकरे
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी एक खळबळजनक आरोप उद्धव ठाकरेंवर केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मृतदेह उद्धव ठाकरेंनी दोन दिवस ठेवला होता. तसंच त्यांच्या मृतदेहाचे ठसे घेण्यात आले, असा आरोप कदमांनी केली होता. त्यावर ठाकरेंनी एका वाक्यात उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, मी गद्दार आणि नमकहराम लोकांना उत्तर देत नाही. तो माणूस नमकहराम आहे. गद्दार आणि हरामखोराला मी उत्तर देणार नसल्याचे ठाकरेंनी सांगितले.