Congress on Sharad Pawar Statement : शरद पवारांनी (Sharad Pawar) आज एक मोठं विधान केलं. येत्या दोन वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेससोबत (Congress) येतील किंवा त्यातील काही पक्ष त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून काँग्रेसमध्ये विलीन होण्याबद्दल विचार करतील, असं विधान पवारांनी केलं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. दरम्यान, पवारांच्या याच विधानावर आता विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) प्रतिक्रिया दिली.
कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पवारांनी केलेल्या वक्तव्याविषयी विचारले. ते म्हणाले की, शरद पवार हे मोठे नेते आहेत, हायकमांडकडे काय चर्चा होतेय. त्या संदर्भात मला माहिती नाही. शरद पवार साहेब मुळात गांधीवादी विचारसरणीचे आहेत. गांधी विचार कोणीही संपवू शकत नाही. काही पक्ष हे अवकाळी पावसासारखे आहेत. अवकाळी पाऊस जनमाणसाला उद्धवस्त करून जातो, तशी आताच्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे, परंतु कॉंग्रेस हा निरंतर वाहणाऱ्या नदीसारखा पक्ष आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
राजीव गांधींपासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत विकास हाच अजेंडा राहिला आहे. आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. जनता संपूर्ण देश बदलण्याची तयारी करून बसलेली आहे. काँग्रेसच्या मागे जनता उभी असल्याचे दिसून येत आहे. पवार साहेबांच्या बोलण्यात तथ्य आहे आणि पवार साहेबांसारखे मोठे नेते ज्यावेळी बोलतात तेव्हा त्यांचा फार दूरचा अभ्यास असतो. त्यांना दूरदृष्टी आहे. शरद पवारांचा जन्मच कॉंग्रेस आहे. कॉंग्रेस आणि गांधी विचारांच्या तालमती ते तयार झाले आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात झाली. त्यामुळे काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल, असं वाटणं स्वाभाविक आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले?
इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना शरद पवार म्हणाले, आगामी काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक समन्वय राखून काम करतील. यापैकी काही प्रादेशिक पक्ष हे त्यांचं हित लक्षात घेऊन कॉंग्रेस पक्षात विलीन होतील, असा अंदाज पवारांनी वर्तवला. मग हाच निकष तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला लागू होईल का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. यावर पवारांनी सांगितले की, मला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत कोणताही फरक दिसत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी आणि नेहरूंच्या विचारसरणी मानणारे आहोत, असं पवार म्हणाले.