4 जून 2024. अमरावती मतदारसंघातून काँग्रेसच्या (Congress) बळवंत वानखडे (Balawant Wankhede) यांनी गुलाल उधळला होता. त्यांच्या विजयाची रॅली शहराच्या मुख्य राजकमल चौकात आली होती. त्याच वेळी गाडीचं सनरुफ उघडत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) बाहेर आल्या. वानखडे यांच्या मागे उभ्या राहिल्या अन् धनुष्यातून बाण सोडण्याची अॅक्टिंग करत भाजपच्या नवनीत राणा (Navneet Rana) यांना त्यांच्याच स्टाईलने प्रत्युत्तर दिले. त्यांचा हा व्हिडीओ देशभरात व्हायरल झाला.
ठाकूर यांनी त्यांच्या याच नडण्याच्या स्टाईलने, आक्रमक स्वभावाने पण शांत डोक्याने चाली खेळत अमरावतीचे मैदान मारले. आता विधानसभेला ठाकूर यांचा त्यांच्याच तिवसा पराभव करण्याचा विडा नवनीत राणा यांनी उचलला आहे. मागच्या 15 वर्षांपासून जंग जंग पछाडूनही भाजपला तिवसा मतदारसंघात यश हाती आलेले नाही. त्यामुळे यंदा तरी राणा यांची प्रतिज्ञा यशस्वी होणार का? यशोमती ठाकूर यांचा पराभव होणार का? की चौथ्यांदा निवडून येत ठाकूरच आमदार होणार? नेमकं काय घडतंय तिवसा विधानसभा मतदारसंघात? (Will Congress’s Yashomati Thakur vs BJP’s Rajesh Wankhade fight in Tiosa Assembly Constituency)
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटनंतर सर्वात मोठा मतदारसंघ म्हणजे तिवसा. 2009 च्या पुनर्रचनेत तिवसा तालुक्यासह मोर्शी, भातकुली आणि अमरावती या तीन तालुक्यातील काही गावांचा मिळून विस्तीर्ण मतदारसंघ तयार झाला आहे. हा मतदारसंघ मुळातच काँग्रेस बालेकिल्ला. 1978 पासून झालेल्या नऊ निवडणुकांमध्ये काँग्रेसने तब्बल पाचवेळा विजय मिळविला आहे. यात काँग्रेसचे 1978 आणि 1980 च्या निवडणुकीत भैय्यासाहेब ठाकूर, 1985 आणि 1995 मध्ये शरद तसरे यांनी विजय मिळविला.
1990 च्या एका निवडणुकीत सीपीआयच्या भाई मंगळे यांनी तसरे यांचा अवघ्या 1300 मतांनी पराभव केला. 1995 साली भैय्यासाहेब ठाकूर यांना काँग्रेस पक्षाने तिकीट नाकारले. त्यांनी काँग्रेस बंडखोरी केली. मात्र शदर तसरे यांनी ठाकूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. 1998 साली ठाकूर यांना खादी ग्रामउद्योग मंडळाचे राज्याचे उपाध्यक्ष पद मिळाले. त्यानंतर 1999 साली काँग्रेसने ठाकूर यांना पुन्हा तिकीट दिले. तर तसरे यांनी नव्याने स्थापना झालेल्या राष्ट्रवादीचे तिकीट घेतले. या मत विभागणीचा युतीला फायदा झाला अन् पहिल्यांदाच भाजपने या मतदारसंघात शिरकाव केला. भैय्यासाहेब यांचा अवघ्या 1100 मतांनी पराभव झाला.
2004 च्या निवडणुकीत भैय्यासाहेब ठाकूर यांनी मुलगी यशोमती ठाकूर यांना तिकीट मिळवून दिले. तर भाजपकडून तट्टे मैदानात होते. यात तट्टे यांनी यशोमतीताईंचा सात हजार मतांनी पराभव झाला. या पराभवाने खचून न जाता यशोमती ठाकूर यांनी तिवसा मतदारसंघात सातत्याने संपर्क ठेवून संघटनात्मक बांधणी केली. मतदार संघातील प्रश्न सोडवण्यासाठी ठाकूर यांनी स्वत:ला झोकून दिलं. शेतकरी, महिलांच्या प्रश्नांवर त्यांनी अनेक आंदोलने केली. पक्षानेही ठाकूर यांना ताकद दिली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिवपदी त्यांची निवड झाली. त्यांना राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी काम करण्याची संधी मिळाली.
त्याचा फायदा यशोमती ठाकूर यांना 2009 च्या निवडणुकीत झाला. त्यांनी तिवसा मतदार संघात काँग्रेसचा झेंडा फडकाऊन इथल्या भाजपच्या वर्चस्वाला छेद दिला. तिथून जिल्ह्यात यशोमती पर्वाला सुरुवात झाली. 2014 मध्ये ठाकूर यांच्यासमोर अनेक आव्हाने होते. पहिले म्हणजे मोदी लाट होती, दुसरे म्हणजे सर्वच पक्ष स्वतंत्र होते, त्यामुळे मत विभागणीचा मोठा धोका होता. तिसरे म्हणजे ठाकूर यांना त्यांच्याच सख्ख्या बहिणीने आव्हान दिले होते. चौथे भाजपने निवेदिता चौधरी यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे माजी आमदार साहेबराव तट्टे यांनी बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली होती.
दोन बहिणींच्या या भांडणात, मोदी लाटेत आणि मत विभागणीमुळे यशोमती ठाकूर यांचा पराभव निश्चित आहे, असे बोलले जाऊ लागले. पण मतदारांनी पुन्हा ठाकूर यांना संधी दिली. तब्बल 58 हजार मते घेऊन त्या विजयी झाल्या. याशिवाय विदर्भात काँग्रेसच्या एकमेव महिला आमदार होण्याचा मान मिळविला. त्यांच्या विरोधातील भाजपच्या निवेदिता चौधरी यांना 38 हजार 367 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे दिनेश वानखडे यांना 29 हजार मते मिळाली होती. ठाकूर यांच्या बहिणीला अवघी नऊ हजार मते मिळू शकली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव झाला. यात ठाकूर यांचा मोठा वाटा होता. नवनीत राणा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडणूक लढवत होत्या. ठाकूर यांनी राणा यांना तिवसा मतदारसंघातून आघाडी मिळवून तर दिलीच. पण जिल्ह्यात राणा यांच्या प्रचार यंत्रणेची सर्व काळजी घेतली. संबंध राज्यात आघाडीचे पानिपत झाले असतानाच अपक्ष उमेदवाराला निवडून आणल्याला काँग्रेसच्या एक आमदार किती पॉवर फुल्ल आहे, हे त्यांनी दाखवून दिले.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेची सुरुवात तिवसामधील ‘गुरुकुंज मोझरी’ येथून केली होती. या यात्रेमुळे यशोमती ठाकूर यांना यावेळी नक्कीच घरी बसवू असा संदेश देण्याचा प्रयत्न झाला. त्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीत ही जागा शिवसेनेच्या वाट्याला होती. शिवसेनेने राजेश वानखडे यांना तिकीट दिले. पण त्यांना 10 हजार 361 मतांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आले. त्यात यशोमती ठाकूर यांना थेट कॅबिनेट मंत्रीपदी संधी मिळाली. त्यांच्याकडे अमरावतीचे पालकमंत्रीपदही आले.
आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत यशोमती ठाकूर यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली आहे. काँग्रेसचे बळवंत वानखडे निवडून आले आहेत. यात ठाकूर यांनीच प्रचाराची मुख्य धुरा सांभाळली होती. तिवसा मतदारसंघातूनही वानखडे यांना 10 हजार मतांची भक्कम आघाडी आहे. मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेसचाच होल्ड आहे. त्यामुळे यशोमती ठाकूर आज तरी भक्कम स्थितीमध्ये आहेत. त्यांच्याविरोधात भाजपकडून राजेश वानखडे यांना मैदानात उतरवले जाऊ शकते. आमदार रवी राणा, माजी खासदार नवनीत राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यातील वितुष्ट टोकाला गेले आहे. त्यामुळे वानखडे यांना बळ देण्याचा राणा दाम्पत्याचा प्रयत्न असणार आहे.
मतदारसंघातील विरोधकांची एकी ही ठाकूर यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. वानखडे यांच्याशिवाय भाजपच्या माजी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, रविराज देशमुख हेही उमेदवारीसाठी दावेदार आहेत. मतदारसंघातील जातीय समीकरणेही भाजपला लक्षात घ्यावी लागणार आहेत. मराठा-कुणबी, माळी आणि मुस्लीम मतदारांची संख्या तुलनेने अधिक आहे. मात्र धनगर आणि तेली समाजाची मतेही भरपूर आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ बहुजातीय आणि बहुभाषिक असा आहे. आता या सगळ्यात भाजपकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार, आणि राणा त्यांना कसे पाठबळ पुरविणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.