Anna Bansode : विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी पुणे जिल्ह्यातील पिंपरी विधानसभा मतदारसंघातून (Pimpri Assembly Constituency) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांचं नाव आघाडीवर आहे. त्यामुळे विधानसभा उपाध्यक्ष पदाची माळ अण्णा बनसोडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता अधिक आहे.
बनसोडे अजितदादा समर्थक आमदार आहेत. तसेच पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी विधानसभा उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आज बनसोडे यांनी अर्ज दाखल केला. याबाबत माहिती देताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी माहिती देताना फेसबुकवर लिहिले की, विधानसभा उपाध्यक्षपदासाठी उद्या, 26 मार्च 2025 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी आपला अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमवेत उपस्थित राहिलो.
बनसोडेंशिवाय आणखी कोणाची नावे चर्चेत?
अजितदादा समर्थक असलेले आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असलेल्या अण्णा बनसोडे यांच्याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी लातूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री संजय बनसोडे, तसेच गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले या तिघांची नावं चर्चेत आहे.
कामरा अन् माझा DNA सारखाच; राऊत बोलले अन् विरोधकांच्या जाळ्यात अडकले…
कोण आहेत अण्णा बनसोडे?
पिंपरी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर देखील त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. 2024 च्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून त्यांनी तिसऱ्यांदा बाजी मारली आहे. अण्णा बनसोडे 2009 मध्ये पहिल्यांदा तर 2019 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2024 मध्ये तिसऱ्यांदा पिंपरी विधानसभा मतदारसंघातून जिंकून आले आहे.