अजितदादांना दोन्ही बंडात साथ; आता 2024 चा पेपर अवघड; अण्णा बनसोडे पदाधिकाऱ्यांना नकोसे?

अजितदादांना दोन्ही बंडात साथ; आता 2024 चा पेपर अवघड; अण्णा बनसोडे पदाधिकाऱ्यांना नकोसे?

– विष्णू सानप

पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन्ही बंडात साथ देणारे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांना 2024 च्या विधानसभेचा पेपर अवघड असल्याचे बोलले जात आहे. बनसोडे यांना अजित पवार यांच्याच गटाचे शहरातील पदाधिकारीच डावलत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. यामुळेच अशा चर्चांना शहरात आतापासूनच सुरुवात झाली आहे. (Pimpri MLA Anna Bansode, who supported Deputy Chief Minister Ajit Pawar in both rebellions)

आमदार बनसोडेंची अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे. मात्र मागील काही काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं आहे. त्यामुळेच पिंपरी-चिंचवड शहरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी त्यांना डावलत असल्याचं बोललं जात आहे.

अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीच्या बंडावेळी त्यांच्यासोबत जाण्याची भूमिका कशी योग्य होती याचा पुनरुच्चार बनसोडे यांनी काही महिन्यापूर्वी केला होता. त्यानंतर दोन जुलैच्या दुसऱ्या बंडातही ते सहभागी झाले. या निष्ठेचे फळ म्हणून त्यांना मंत्रिपद मिळेल, अशाही चर्चा रंगल्या होत्या.

मात्र बनसोडेंच्या पदरी काहीच पडलं नाही. उलटपक्षी आता आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीचे शहरातील पदाधिकारी त्यांची साथ देतील का? आणि त्यांना 2024 ला तिकीटही मिळेल का? हेही सांगणं आता अवघड होऊन बसलं आहे.

पेपर अवघड का?

अण्णा बनसोडे यांना निवडून आल्यानंतर शहरातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सलोख्याचे संबंध ठेवता आलेले नाहीत. याशिवाय शहरातील एकमेव आमदार असूनही त्यांना महापालिकेवर फारसा प्रभाव टाकता आला नाही. त्यात शहर बैठकांकडे त्यांनी केलेलं दुर्लक्ष यामुळे पदाधिकाऱ्यांचा त्यांच्यावर रोष वाढतच गेला. मध्यंतरी बनसोडे यांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी वाढलेली जवळीक यामुळे त्यात अधिकच भर पडली आणि शहर पदाधिकारी आणि त्यांच्यात दुरावा वाढतच गेला.

त्याचवेळी दुसरीकडे भोसरी आणि चिंचवडचे भाजपचे आमदार मात्र, पक्षासाठी झटून काम करताना दिसतात. याच सगळ्याची परिणिती म्हणून शहारातील राष्ट्रवादीच्या विविध बॅनर्सवरुन बनसोडे यांचा फोटो आणि नवा सध्या गायब आहे. साध्या वाढदिवसांच्या बॅनर्सवरही अण्णा बनसोडे यांचा नसलेला फोटो बरच काही सांगून जातो. त्यामुळेच बनसोडे यांना स्थानिक पदाधिकारीच डावलत आहेत का? असे सवाल विचारले जात आहे.

राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या नवीन राजकीय समीकरणामुळे पिंपरीची राखीव असलेली जागा अजित पवार आपल्याकडे ठेवतात की, भाजपला सोडतात हे येत्या निवडणुकीत स्पष्ट होईलच. मात्र, तोपर्यंतची वाट न बघता भाजपने तरुण पदाधिकारी आणि अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे यांना पिंपरी विधानसभेची जबाबदारी दिली आहे.

2014 ला एकसंघ शिवसेनेकडून गौतम चाबुकस्वार यांनी बनसोडे यांचा पराभव केला होता. तेच चाबुकस्वार शिवसेना ठाकरे गटाचे पुढील उमेदवार असू शकतात. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा रोष, भाजपने लावलेली ताकद आणि ठाकरे गटाचे चाबुकस्वार या सर्वांचा सामना एकाचवेळी बनसोडेंना करावा लागणार आहे. या सर्व गोष्टींमुळे बनसोडेंना 2024 चा विधानसभा निवडणूक पेपर अवघड असणार, असं बोललं जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube