राहुल नार्वेकर, राम शिंदेंचं कामकाज नियमबाह्य; मविआ नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट, पत्रही दिलं

Maharashtra Politics : सत्ताधारी पक्षाला साथ देऊन नियमबाह्य पद्धतीने काम करणाऱ्या सभापती आणि अध्यक्ष यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज राज भवन येथे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची भेट घेऊन निवेदन दिले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कामकाजासंदर्भात तक्रार केली.
राज्यपालांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यांची भूमिका ही सरकार विरोधी नसून सरकारच्या निर्णयावर आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी धोरण सुचविणे आहे. तथापि, महाराष्ट्र विधानपरिषद व विधानसभा सभागृहामध्ये सभापती आणि अध्यक्ष यांच्याकडून सभागृहाच्या कामकाजात पक्षपाती व एकांगी भूमिकेचा अवलंब केला जात आहे.
दोन्ही सभागृहाच्या कार्यवाहीमध्ये संसदीय परंपरांचे पालन न करता नियमबाह्य सभागृहाचे कामकाज चालविले जात आहेत. विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षनेत्यांना सभागृहात सभापती आणि अध्यक्षांकडून बायस वागणूक मिळत आहे. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिले जात नाही. त्यांच्या हक्कांचे संरक्षण होण्यासाठी ही बाब आपल्या निदर्शनास आणण्यात येत आहे.
Video : राम शिंदे पराभूत झाले ते बरं झालं; न घेतलेल्या सभेचा उल्लेख करत अजितदादा बोलून गेले
विरोधी पक्षाच्या सदस्यांना आपले मत मांडण्यास मर्यादा घातल्या जात असून महत्त्वपूर्ण चर्चा करताना विरोधी पक्षाची अडवणूक केली जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना कपात सूचना मांडण्याचा अधिकार असताना त्यांच्या सूचनांना सरकारकडून उत्तर दिले जात नाही. पुरवणी मागणीच्या चर्चेच्या वेळी संबंधित खात्याचे मंत्री व राज्यमंत्री सभागृहात उपस्थित राहणे अनिवार्य असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तसेच सभागृहाच्या अदृश्य गॅलरीमध्ये संबंधित खात्याचे सचिव सुद्धा उपस्थित नसतात.
संबंधित खात्याचे राज्यमंत्री उपस्थित असताना खात्याशी संबंधित नसलेल्या मंत्र्यांना चर्चेस उत्तर देण्याचा अधिकार दिला जात आहे. अशाप्रकारे विधानपरिषदेच्या सभापतींनी सभागृह चालविताना निष्पक्षतेचा अभाव दाखवला असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. तसेच विधानसभेच्या अध्यक्षांनी सभागृह चालवितांना निष्पक्षतेचा अभाव दाखविला आहे. तरी या प्रकरणी आपण स्वतः लक्ष घालून विरोधी पक्षास न्याय मिळण्याच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी या पत्रात केली आहे.
यावेळी आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, नाना पटोले, अनिल परब, भास्कर जाधव, भाई जगताप, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, सुनील राऊत, सचिन अहिर, आनंद बाळा नर, प्रवीण स्वामी, अभिजित वंजारी, अजय चौधरी, सुनील शिंदे, अरुण शेठ, ज.मो. अभ्यंकर, मनोज जामसूतकर, सिद्धार्थ खरात, कैलास पाटील व वरुण सरदेसाई उपस्थित होते.