दहीहंडीच्या उत्साहाला डीजेचा अडथळा; पुण्यात पहिल्याच मंडळावर पोलिसांची कारवाई

यंदाच्या दहीहंडी उत्सवात गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ असल्याची माहिती समोर आली आहे.

News Photo   2026 09 05T151053.736

दहीहंडीच्या उत्साहाला डीजेचा अडथळा; पुण्यात पहिल्याच मंडळावर पोलिसांची कारवाई

राज्यभरात दहीहंडी उत्सवाचा उत्साह शिगेला (Dahihandi) पोहोचला असताना ध्वनी प्रदूषणाचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे. सोलापूर, नवी मुंबई, पनवेल, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नागपूर आणि धुळे यांसह विविध शहरांमध्ये डीजेवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यात दहीहंडी उत्सवातील ध्वनी प्रदूषणाच्या प्रकरणात पोलिसांनी पहिली कारवाई केली आहे.

बिबवेवाडी ओटा परिसरातील श्रीकृष्ण तरुण मंडळावर ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळाने निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपकांचा वापर केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी संबंधित मंडळाची साऊंड सिस्टिमही जप्त केली आहे. यंदाच्या दहीहंडी उत्सवात गुन्हा दाखल झालेले हे पहिले मंडळ असल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यानंद बापटांनाच पुणेकरांनी डीजेवर नाचवलं; एआय व्हिडीओ व्हायरल

दहीहंडी उत्सवासाठी लाऊड स्पीकरच्या वापराबाबत पोलिसांनी स्पष्ट नियम घालून दिले होते. त्यानुसार 4 बेस आणि 4 टॉप स्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, श्रीकृष्ण तरुण मंडळाकडून 8 बेस आणि 8 टॉप स्पीकर लावण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे परवानगीच्या मर्यादेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली.

या मंडळाने दहीहंडी कार्यक्रमासाठी पारंपरिक वाद्यांच्या वापराची परवानगी घेतली होती. मात्र, परवानगीतील अटींचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकर लावण्यात आल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊन नागरिकांना त्रास झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी मंडळाचे अध्यक्ष राहुल प्रकाश जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषणाबाबत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. परवानगीच्या मर्यादेपेक्षा अधिक ध्वनिक्षेपक किंवा नियमबाह्य पद्धतीने साऊंड सिस्टिमचा वापर केल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे उत्सव साजरा करताना ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version