Download App

काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी; जेष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका चंद्रलेखा बेलसरे यांचे विचार

Chandralekha Belsare : काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी असून ती जपण्याबरोबरच विकसित करणे आणि तिचे संवर्धन करण्याची

  • Written By: Last Updated:

Chandralekha Belsare : काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी असून ती जपण्याबरोबरच विकसित करणे आणि तिचे संवर्धन करण्याची आवश्यकता आहे असे विचार जेष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका व पहिल्या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा चंद्रलेखा बेलसरे (Chandralekha Belsare) यांनी व्यक्त केले.

काव्यमित्र संस्था आणि अपेक्षा मासिक परिवार, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानप्रसाद कार्यालय, सदाशिव पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राज्यस्तरीय काव्यविश्व साहित्य संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी संमेलनाचे स्वागताध्यक्ष, ज्येष्ठ समाजसेवक सुरेश कोते, संमेलनाचे उद्घाटक, पेरिविंकल ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, उद्योजक अशोक कदम, छंद दिवाळी अंकांचे संपादक दिनकर शिलेदार,काव्यमित्र संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र सगर व अपेक्षा मासिकाचे संपादक दत्तात्रय उभे उपस्थित होते. यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी डॉ जयश्री घोडके, नामदेव हुले, श्रीराम भोमे, प्रकाश नाईक, अंकुश उभे आदींचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला. चंद्रलेखा बेलसरे म्हणाल्या, आंतरमनातील अनुभूतीचा आविष्कार म्हणजे कविता होय. भाव भावनांच्या वर्तुळात काव्य आकार घेत असते. तर कधी सूर आणि तालाच्या माध्यमातुन मनाला भिडते. काव्याची उंची, त्यातील भाव आणि अर्थ ही त्याची व्याप्ती असते. काव्य म्हणजे भाव भावनांचा मुक्त हुंकार असतो. तर मनाच्या गाभाऱ्यातून ती फुलत असते. काव्य हा जिव्हाळ्याचा विषय असून प्रत्येकाच्या मनात विविध माध्यमातुन व्यक्त होत असते.

दिनकर शिलेदार म्हणाले, साहित्याच्या व्याप्तीचे मोजमाप करता येत नाही. विविध प्रकारां मधून ते व्यक्त होते व विविध संमेलनामधुन त्याची प्रचिती येत आहे.

सुरेश कोते म्हणाले, पुस्तक वाचण्यापेक्षा मी आजवरच्या वाटचालीत सेवेच्या माध्यमातून विविध स्वभावाची माणसे वाचली. असे असले तरी साहित्याच्या क्षेत्रात जी मंडळी काम करीत आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम मनापासून करतो. कारण त्यामध्ये मला आनंद मिळतो. तर राजेंद्र बांदल म्हणाले, साहित्य विषयक विविध उपक्रम हे समाजपयोगी असून यामुळे वाचन आणि साहित्य संस्कृतीला अधिक बळ मिळणार आहे.

या संमेलनाच्या माध्यमातुन नव कवींना व्यासपीठ मिळणार आहे. संमेलनाच्या दुपारच्या सत्रात निमंत्रितांच्या हास्य कवी संमेलनाने तसेच आधी झालेल्या निमत्रितांच्या कवी संमेलनात कवींनी काव्यानंद रसिकांना देऊन मंत्रमुग्ध केले. सपान,दैना,चहा,संडे,नवी स्कूटर, बायकोचा रुसवा,व्यथा,प्रेम प्रेमच असते,असे रोजच्या वाटचालीतील विषय हिंदी आणि मराठी गाण्यांच्या चालीवर सादर केले.श्रीराम घडे, देवेंद्र गावंडे, बिभिषण पोटरे, हणमंत मेहेत्रे जयवंत पवार या कवींचा यात सहभाग होता. त्यानंतरच्या सत्रात जीवन गौरव पुरस्कार, साहित्य गौरव पुरस्कार, आणि विशेष कृतज्ञता सन्मान जेष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश वाकचौरे आणि अन्य पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

तर दुपारच्या सत्रात “काव्यविश्व आणि मराठी कवितेची वाटचाल” या विषयावर परिसंवाद झाला. डॉ. शीतल मालुसरे अध्यक्षस्थानी होत्या.यामधे प्रा.विजय लोंढे आणि प्रा.अनघा ठोंबरे हे वक्ते सहभागी झाले होते. साक्षी सगरने सूत्रसंचालन केले. दत्तात्रय उभे यांनी प्रास्ताविकात संमेलनाच्या आयोजन मागची भूमिका स्पष्ट केली. दोन्ही संस्थांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संमेलनाचं आयोजन करण्यात आले आहे.

महाकुंभात ‘नो व्हीकल झोन’ नव्या ट्रॅफिक नियमांमुळे भाविकांचे हाल, करावा लागणार 10 किमी चालत प्रवास

साहित्याच्या क्षेत्रात काव्याला विशेष महत्त्व आहे. अनेक ग्रंथ काव्याच्या माध्यमातुन पुढे आले आहेत. यामुळे मराठी भाषा समृद्ध होण्यास हातभार लागला आहे. नवोदित कवींना व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणजे हे काव्यविश्व साहित्य संमेलन होय. सुरुवातीला ग्रंथ पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. सुप्रसिद्ध गायिका वैजू चांडवले यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन राजेंद्र सगर यांनी केले.

follow us