हर्षवर्धन पाटील पुन्हा नवा डाव खेळणार ! काँग्रेसच्या वाटेवर…

Harshvardhan Patil : राजकीय हवेचा रोख ओळखण्यात पटाईत असलेले हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणार का ?

Harshvardhan Patil

Harshvardhan Patil

Harshvardhan Patil : सलग चार टर्म मंत्रिमंडळात राहिलेला नेता. शरद पवार व अजित पवार यांच्याशी त्यांना तीव्र राजकीय संघर्ष करावा लागलेला. पुन्हा आमदार होण्यासाठी काँग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये गेले पण यश मिळाले नाही. त्यामुळे शेवटी राजकीय भवितव्यासाठी विधानसभेला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले. पुन्हा नशिबी पराभवच लिहिलेला. अशा नेत्याचा राजबिंडा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आलाच असेल. नसेल आला तर सांगतो, तो नेता म्हणजे इंदापूरमधील माजी मंत्री व सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले हर्षवर्धन पाटील. (Harshvardhan Patil)

हर्षवर्धन पाटील यांच्याबाबत आज चर्चा करण्याचे कारण म्हणजे या नेत्याबाबत नुकतीच घडलेली एक घटना. माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त इंदापूरात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून सात वर्ष झाले आहेत. त्यानंतर पक्षाचा एखादा बडा नेता पाटील यांच्याकडे येण्याची ही पहिलीच वेळ असावी. त्यामुळे राजकीय हवेचा रोख ओळखण्यात पटाईत असलेले हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये येणार का ? याची राजकीय चर्चा सुरू झालीय. त्यांचे राजकारण कसे राहिलेले आहेत. पुन्हा ते पक्ष बदलतील का ? पक्ष बदलला तर तो काँग्रेस असेल का हे जाणून घेऊया..

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ताफ्याला ओव्हरटेक करणं पडलं महागात; पुण्यात 32 वर्षीय तरूणावर गुन्हा दाखल


काँग्रेसने तिकीट नाकारले, निवडून आले अन् मंत्री झाले

हर्षवर्धन पाटील यांची विधिमंडळातील कारकीर्दीची सुरुवात अपक्ष म्हणूनच झाली. स्थानिक राजकारण ते काँग्रेसमधून करत होते. 1995 मध्ये त्यांनी काँग्रेसकडे विधानसभेचे तिकीट मागितले. पण काँग्रेसने तिकीट नाकारले. ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि आमदार झाले. त्यांनी भाजप-शिवसेना युतीला पाठिंबा दिला आणि पहिल्यांदाच ते राज्यमंत्री झाले. शिवसेनेच्या कोट्यातून ते मंत्री झाले होते. त्यांना कृषी व जलसंधारण मंत्रिपद मिळाले. 1999 मध्ये पुन्हा अपक्ष निवडणूक लढून विधानसभेवर गेले. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा दिला आणि काँग्रेसकडून ते कॅबिनेट मंत्री झाले. 2004 मध्ये ते पुन्हा अपक्ष लढले आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबरोबर सत्तेत गेले. सांस्कृतिक कार्य व महिला व बालकल्याणमंत्री झाले. त्यावेळी त्यांचा अजित पवार यांच्याशी राजकीय संघर्ष सुरूच होता. तर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे हर्षवर्धन पाटील यांना पुण्यात काँग्रेस वाढविण्यासाठी बळ देत होते. 2009 मध्ये ते काँग्रेसच्या तिकीटावर लढत निवडून आले आणि सहकारमंत्री झाले. त्यांनी अपक्ष रिंगणात असलेले दत्तात्रय भरणे यांचा सात हजार मतांनी पराभव केला. भरणे यांना अजितदादांची पूर्ण ताकद होते. परंतु पाटील यांना राजकीय धक्का बसला नाही.


iPhone 17 खरेदी करता येणार फक्त 34,355 रुपयांत! जाणून घ्या सर्वात भारी ऑफर

2014 मध्ये भरणेंनी गड भेदला
2014 मध्ये आघाडी फुटली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. त्यात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी काँग्रेसच्या हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. सलग चार टर्म मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांना भरणेंच्या अडून अजित पवारांनी दिलेला हा मोठा धक्का होता. त्यानंतर 2019 ला राजकीय वातावरण बघून हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची वाट धरली. पण तिथे त्यांच्या हाती निराशा आली. भरणे यांनी त्यांचा 14 हजार मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादी फुटली आणि हर्षवर्धन पाटील शरद पवारांकडे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन राष्ट्रवादी पक्ष झाले. लोकसभेपर्यंत हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्येच होते. त्यामुळे त्यांना महायुती म्हणून सुनेत्रा पवार यांचे काम करावे लागले. पुढे विधानसभेच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या विजयात माझा अदृश्य हात असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते. सुप्रिया सुळे यांना इंदापूरमधून मताधिक्य होतेच. इंदापूरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच लढत झाली. त्यात दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पुन्हा तब्बल वीस हजार मतांनी पराभव केला. सलग तीन अपक्ष आणि एकदा काँग्रेस असे चार टर्म आमदार व मंत्री राहिलेले हर्षवर्धन पाटील यांना सलग तीन वेळा पराभव पत्कारावा लागला. सध्या हर्षवर्धन पाटील यांच्याकडे राष्ट्रीय सहकार साखर संघाचे अध्यक्षपद आहे. ते ही 2024 ला भाजपमध्ये असताना मिळालेले आहे.


हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसकडे जाणार का ?

काँग्रेसच्या नेते बाळासाहेब थोरात यांना इंदापूरला कार्यक्रमात बोलविण्यामागे हर्षवर्धन पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये जातील, अशा राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. भवितव्यातील राजकीय परिस्थिती बघून हर्षवर्धन पाटील असे पाऊल टाकू शकतात. पण सध्या तरी ते काँग्रेसमध्ये जावू शकत नाही. कारण त्यांची मुलगी अंकिता पाटील-ठाकरे या घड्याळाच्या चिन्हावर जिल्हा परिषद सदस्य झालेल्या असून, त्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती आहेत. हर्षवर्धन पाटील यांना पुन्हा पक्ष बदलायचा असेल तर ते भाजपबरोबर जाऊ शकतात. त्यांची शिक्षणसंस्था, दोन सहकारी साखर कारखाने आहेत. साखर संघामुळे ते अमित शाह यांच्या जवळ गेलेले आहेत, असे तेथील स्थानिक पत्रकारांचे मत आहे. वाऱ्याची दिशा बघून हर्षवर्धन पाटील निर्णय घेतात. परंतु गेल्या दोन वेळेस ते त्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता ते भविष्यात जपून पाऊल टाकतील हे नक्की.

Exit mobile version