इंदापूरचे शेतकरी आक्रमक; पुण्यात बोंबाबोंब आंदोलन, मंत्री भरणे अन् हर्षवर्धन पाटीलही सहभागी
जलसंपदा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन पाणी विकल्याचा आरोप इंदापुरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
खडकवासला धरणाचे पाणी इंदापूरला (Indapur) न मिळाल्यामुळं तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी पुण्यातील सिंचन भवनासमोर बोंबाबोंब आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांसोबत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव तथा पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणेही सहभागी होते. विशेष म्हणजे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषदेच्या सभापती अंकिता पाटील यांनीही आंदोलनस्थळी आहेत. खडकवाला प्रकल्पाचे पाणी सोडण्यासंदर्भात अधिकाऱ्यांची चर्चा केली आहे.
यावेळी मात्र, अधिकाऱ्यांकडून फुरसुंगी येथील कालवा फुटण्याचं कारण देऊन एक हजार क्युसेकने पाणी सोडलं जात असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडं जलसंपदा विभागातील काही कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन पाणी विकल्याचा आरोप इंदापुरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळं इंदापूरला पाणी न मिळण्याचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित होत आहे. खडकवासला धरणातून इंदापूरला टेलपर्यंत पाणी सोडले जातं. पण, यावेळी उन्हाळी आवर्तन तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालंच नाही, त्यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यातूनच आज सिंचन भवनासमोर ठिय्या मांडला आहे.
वर्ष लोटलं तरी पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित, खरीप हंगामाच्या तोंडावर अडचणी वाढल्या
प्रत्येक आवर्तनावेळी १३०० क्युसेकने कालव्यातून पाणी सोडले जाते, पण या वेळी फुरसुंगीत कालावा फुटण्याची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे अधिकाऱ्यांकडून १००० क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे, त्यामुळे पाणी पुढे सरकण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भात आंदोलनात सहभागी झालेले इंदापूर पंचायत समितीचे सदस्य श्रीराज भरणे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळं इंदापूरला पाणी मिळू शकलेले नाही. आमच्या हक्काचं पाणी इंदापूरपर्यंत पोचलेले नाही. अधिकाऱ्यांना वारंवार फोन करूनही पाणी सोडलं गेलं नाही असं ते म्हणाले.
फुरसंगीत कालवा फुटण्याची शक्यता आहे, त्यामुळे आम्ही १३०० क्युसेकने पाणी सोडू शकत नाही, त्याऐवजी आम्ही १००० क्युसेकने पाणी सोडले आहे, असं अधिकारी सांगत आहेत, त्यामुळेच इंदापुरात पाणी येत नाही. वडिल मंत्री असूनही पाणी येत नाही, मग इंदापूरच्या वाट्याचं पाणी कुठं जातंय?, यावर श्रीराज भरणे म्हणाले, आमचं शेतकरी कुटुंब आहे. त्या हक्कासाठी मी आज आलो आहे. मी पंचायत समितीचा सदस्य आहे, त्यामुळे मी अधिकाऱ्यांच्या कायम संपर्कात होतो. देशमुख यांच्या संपर्कात मी होतो, ते मला फक्त एकच फोटो पाठवायचे. फुरसुंगीत एवढा कचरा साठला आहे, एवढंच ते मला सांगायचे. पण त्यांनी नियोजन का केलं नाही असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर या लोकांनी कालव्याची स्वच्छता का केली नाही, हे विचारण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र जमलो आहेात. मंत्री दत्तात्रेय भरणे हे आता जलसंपदा विभागाचे देशमुख यांच्या भेटीसाठी आले आहेत. उद्या आम्हाला पाणी मिळालं पाहिजे, यासाठी आम्ही आज या ठिकाणी एकत्र आलो आहोत, असेही भरणे यांनी स्पष्ट केले. कार्यकारी अभियंत्याच्या चुकीमुळे, तसेच कुणाचे तरी प्यादे बनून काम केल्यामुळे इंदापूरला जाणीवपूर्वक पाणी दिलेले नाही. दौंड, बारामतीला पाणी मिळते पण इंदापूरला तालुक्याला का नाही? या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.