धरणांमध्ये भरपूर पाणी, तरीही टंचाईचा इशारा; एल-निनोमुळे पावसाची अनिश्चितता, सरकारकडून पाणी बचतीचे आवाहन

ऑगस्ट 2026 अखेरपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहे.

  • Written By: Published:
Untitled Design 17

Government appeals for water conservation : राज्यातील धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असला, तरी एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर पुढील वर्षासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील एकूण पाणीसाठ्याचा आढावा घेण्यात आला. सादर करण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध धरणांमध्ये सध्या एकूण 653.63 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. हा साठा गतवर्षीच्या तुलनेत 101.77 टीएमसीने अधिक असून, मागील वर्षी याच काळात तो 551.86टीएमसी इतका होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत एल-निनोच्या प्रभावामुळे पावसात अनियमितता येण्याची शक्यता व्यक्त करत, पुढील काळात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी आतापासूनच काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केले. तसेच ऑगस्ट 2026 अखेरपर्यंतच्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना राबवण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले आहे.

यावेळी जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती आणि एल-निनोच्या प्रभावाचे संभाव्य परिणाम स्पष्ट केले. एल-निनोच्या प्रभावामुळे यापूर्वी 2014 मध्ये सुमारे 12 टक्के, तर 2015 मध्ये सुमारे 14 टक्के पाणीसाठ्यात घाट झाली होती, ज्यामुळे त्या काळात राज्यात पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली होती. त्या पार्श्वभूमीवर 15 ऑक्टोबर 2014 रोजी 872 टीएमसी, तर 2015 मध्ये 625 टीएमसी पाणीसाठा होता. तुलनेत 15 ऑक्टोबर 2025 रोजी हा साठा 1330.97 टीएमसी एवढा होता, जो सध्या 21 एप्रिल 2026 रोजी 653.63 टीएमसीवर आला आहे.

महसूल विभागनिहाय पाहता, पुणे विभागात सर्वाधिक 206.55 टीएमसी पाणीसाठा असून, छत्रपती संभाजीनगर विभागात 129.37 टीएमसी, नाशिक विभागात 101.96 टीएमसी, नागपूर विभागात 80.79 टीएमसी, अमरावती विभागात 73.72 टीएमसी, तर कोकण विभागात 61.24 टीएमसी पाणीसाठा नोंदवण्यात आला आहे.

प्रमुख धरणांमध्ये जायकवाडी धरणात 42.03 टीएमसी, कोयना धरणात 33.62 टीएमसी, उजनी धरणात 13.39 टीएमसी, पेंच प्रकल्प समूहात 26.57 टीएमसी, इसापूरमद्ये 21.45 टीएमसी, भातसा धरणात 15.70 टीएमसी, तसेच गोसीखुर्द प्रकल्पात 14.31 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूणच, राज्यात सध्या पाणीसाठा समाधानकारक असला, तरी एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता पाणी जपून वापरने आणि कटेवर नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचा स्पष्ट संदेश या बैठकीतुन देण्यात आला आहे.

follow us