पालकमंत्र्यी शिरसाट यांच्याकडून पंपचालकांना तंबी, डिझेलअभावी अनेक पाणी टँकरही बंद
कारखान्यातील यंत्रे चालवण्यासाठी आणि तयार माल बाजारपेठेत किंवा बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने उत्पादन थंडावले आहे.
देशभर सुरू असलेल्या पेट्रोल आणि डिझेल टंचाईचा (Petrol) मोठा फटका आता छत्रपती संभाजीनगर शहराला बसण्यास सुरुवात झाली आहे. डिझेल अभावी महापालिकेचे पाण्याचे टँकर जागेवरच उभे राहिल्याने शहरातील पाणीपुरवठा यंत्रणा कोलमडली आहे. दुसरीकडे, ऐन हंगामात डिझेलसाठी शेतकऱ्यांची आणि उद्योजकांची होणारी धावपळ पाहता, जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या पेट्रोल पंप चालकांची रविवारपासून झाडाझडती घेण्याचा कडक इशारा दिला आहे.
शहरातील ‘नो नेटवर्क’ म्हणजेच ज्या भागात पाईपलाईन नाही, अशा भागांतील पाणीपुरवठ्याला डिझेल टंचाईचा मोठा फटका बसला आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे एकूण ९२ टँकर आहेत, त्यापैकी अनेक टँकर शुक्रवारी डिझेलअभावी बंद होते. सिडको एन-५ (Cidco N-5) आणि नक्षत्रवाडी या मुख्य जलकुंभांवरून शहरातील तब्बल ६० वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, या जलकुंभांवर केवळ ५३ टँकर उपलब्ध राहिल्याने, जलकुंभात पुरेसे पाणी असूनही ते नागरिकांपर्यंत पोहोचवता आलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
छत्रपती संभाजीनगर-जालना जागेसाठी भाजप आग्रही; बीड धाराशिव कुणाकडं जाणार? काय आहेत गणित?
पालकमंत्र्यांकडून पंपचालकांची खरडपट्टी; रविवारपासून झाडाझडती
शेतकरी आणि नागरिकांचे हाल होत असल्याचे पाहून पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी जिल्ह्यातील विविध पेट्रोल पंपांना अचानक भेटी देऊन परिस्थितीची पाहणी केली. मध्यरात्रीपासून शेतकरी डिझेलसाठी पंपांवर रांगा लावून उभे असल्याचे पाहून पालकमंत्र्यांचा पारा चढला. त्यांनी उपस्थित पंपचालकांना कडक शब्दांत सुनावले आणि त्यांचे ‘स्टॉक रजिस्टर’ तपासण्याचे आदेश दिले. “अनेक पंपांवर पेट्रोल-डिझेलचा साठा उपलब्ध असूनही, त्याचे वितरण न करता कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे.
अशा साठेबाजांची रविवारपासून प्रशासनामार्फत कडक झाडाझडती घेतली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. तसेच उद्योगांसोबतच शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत प्राधान्याने डिझेल पुरवण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. डिझेल टंचाईची झळ वाळूज आणि चिखलठाणा औद्योगिक वसाहतीतीलउद्योगांनाही बसत आहे. कारखान्यातील यंत्रे चालवण्यासाठी आणि तयार माल बाजारपेठेत किंवा बंदरांपर्यंत पोहोचवण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने उत्पादन थंडावले आहे. या संकटात भर म्हणून, तीन महिन्यांपूर्वी झालेल्या औद्योगिक गॅसच्या तुटवड्यामुळे कंपन्यांनी कामाच्या शिफ्ट कमी केल्या होत्या.
च्याच काळात गावी गेलेले कामगार आता कामावर परतायला तयार नाहीत, त्यामुळे उद्योजकांसमोर ‘कामगारांचा तुटवडा’ ही नवीन डोकेदुखी ठरत आहे. उत्पादनात घट झाल्याने उद्योजक चिंतेत आहेत. उद्योगांसाठी डिझेलचा विशेष पुरवठा करण्याची मागणी होत असली, तरी जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी तांत्रिक अडचण स्पष्ट केली. ते म्हणाले, “इंधन टंचाई सर्वत्र आहे. उद्योगांना विशेष तरतुदीनुसार वेगळा डिझेल पुरवठा करणे पंप चालकांच्या व्यवस्थेनुसार अशक्य आहे. मात्र, प्रशासन म्हणून आम्ही औद्योगिक वसाहतींमधील पेट्रोल पंपांवर पुरेसा इंधन साठा उपलब्ध राहील, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत.