Download App

शरद पवारांचा पुरंदर दौरा रद्द! प्रकृतीबाबत डॉक्टरांनी दिली माहिती; पाडव्याची भेट होणार का?

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा रविवार (12 नोव्हेंबर) नियोजित पुरंदर दौरा प्रकृतीच्या कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पाडव्याला नेहमीप्रमाणे बारामती (Baramati) आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक आणि कार्यकर्त्यांना पवार भेटणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. (Important update on the health of NCP President Sharad Pawar)

शरद पवार यांच्यासह सर्व पवार कुटुंबिय बारामतीमध्ये उपस्थित आहे. या दरम्यान काल (11 नोव्हेंबर) विद्या प्रतिष्ठानची एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पवार यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यावेळी डॉक्टरांनी तातडीने तपासणी करत त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. सततच्या धावपळीमुळे काहीसा थकवा आणि दिल्लीतील प्रदुषणामुळे त्यांच्या घशाला सूज आली होती, अशी माहिती डॉ. रमेश भोईटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Pune News : पवार ‘फॅमिली’ची दिवाळी! शरद पवार अन् अजितदादा पुन्हा एकत्र

डॉ. भोईटे यांनी आज पवार यांची पुन्हा तपासणी केली. यानंतर तब्येत ठीक असून त्यांना विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले. त्यानुसार पवार यांचा रविवारचा नियोजित पुरंदर दौरा रद्द करण्यात आला आहे. मात्र पाडव्याला नेहमीप्रमाणे बारामती आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नागरिक, कार्यकर्त्यांना पवार भेटणार आहेत. शिवाय पाडव्याच्या दिवशी श्री महावीर भवन येथे संध्याकाळी पाच वाजता बारामतीच्या व्यापाऱ्यांशीही संवाद साधणार आहेत.

पवार दोन दिवसांपूर्वी दिल्लीत होते. त्यानंतर काल (10 नोव्हेंबर) पुण्यात होते. तर आज बारामती उपस्थित आहेत. दिवाळीनिमित्त अनेक वर्षांपासून सर्व पवार कुटुंबीय बारामतीच्या गोविंदबाग या निवासस्थानी एकत्र येत असते. तर पाडव्याला बारामतीतील नागरिक आणि राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत असतात. यंदाही ही भेट होणार आहे.

ब्रेकिंग : शरद पवार यांची तब्येत अचानक बिघडली; अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांकडून तपासणी

अजित पवार उपस्थित राहणार का?

दरम्यान, यंदा राष्ट्रवादीत (NCP) फूट पडल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार पाडवा गोविंद बागेत साजरा करणार का, याबाबत उत्सुकता आहे. अशात डेंगी आजारामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने आपण उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र त्यानंतरही अजित पवार यांचा दिल्ली आणि बारामती दौरा पार पडला आहे. त्यानंतर पुण्यात पवार कुटुंबीयांच्या दिवाळी स्नेहभोजनाला अजित पवार सामील झाले होते.

शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार याचं पुण्यातीतील बाणेर परिसरात निवास्थान आहे. त्यांच्या निवासस्थानी सर्व पवार कुटुंबीय एकत्र जमले होते. रक्षाबंधनाला अजित पवार आले नव्हते. त्यामुळे दिवाळी आणि भाऊबीजेला येणार का, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, आज पवार कुटुंबीयांच्या दिवाळी स्नेहभोजनाला ते उपस्थित होते. सकाळी बारा वाजताच्या सुमारास अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार हे बाणेरला पोहोचले. त्यापूर्वीच सुप्रिया सुळे आणि शरद पवार हे बाणेरला पोहोचले होते. त्यानंतर अजितदादा दिल्लीला रवाना झाले.

Tags

follow us