पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात आज (Accident) भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू झाला. धनगर बाबा मंदिरासमोर असलेल्या पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला आज नाशिक जिल्ह्यामध्ये देखील भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये आईसह दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय 24) आणि नेहा पांडुरंग शिंदे (वय 20) अशी मृत बहिणींची नावे असून त्या पुण्यातील पुनावळे परिसरातील रहिवासी होत्या. अपघाताच्या वेळी दोघी बहिणी दुचाकी (एमएच 14 केएम 9968) वरुन जात होत्या. याच दरम्यान मागून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच 40 डीसी 0964) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दोघींनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा ट्रक जितेंद्र निराळे (मूळ रहिवासी – मध्य प्रदेश) चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
तो उमेदवार नमकहरामी! मतदानाच्या तोंडावर अश्विनी जगतापांच्या स्टेटसने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काळेवाडी पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. याबाबत माहिती देताना काळेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी चालकाला ताब्यात घेण्यात आले असून घटनेचा पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले आहे.
नाशिकच्या चांदवड – मनमाड रस्त्यावर सिमेंटच्या विटा वाहून नेणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. यात ट्रक पलटी झाला होऊन या अपघातात मध्य प्रदेशातील एका मजूर कुटुंबातील मायलेकांचा करुण अंत झाला असून आईसह तिच्या दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. मनमाडकडून चांदवडच्या दिशेने येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहचवले.
