पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. (Pune) निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षांतील अनेक मातब्बर नेत्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे शहरात भाजपचा विजय मानलं जात आहे.
आगामी निवडणुकांआधी भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरु झाली आहे. पिंपरी चिंचवडमधील अनेक नेत्यांनी आज कमळ हाती घेतले. मुंबईत झालेल्या या विशेष सोहळ्यात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे आणि शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
मनसेचे दिवंगत नेते रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळेचा भाजपमध्ये प्रवेश
भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडची प्रगती मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडून आता मेट्रोपॉलिटन सिटीकडे होत आहे. अनेक वर्षांचा अनुभव पाठीशी असलेल्या या दिग्गज नेत्यांच्या प्रवेशामुळे शहराच्या विकासाची घोडदौड आता अधिक वेगाने होईल. या सर्वांच्या सहभागामुळे भाजपची ताकद कित्येक पटीने वाढली आहे.या मोठ्या पक्षप्रवेशामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय समीकरणांमध्ये भाजपचे पारडे जड झाले असून, विरोधकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
यामध्ये ठाकरे गट, अजित पवार गट आणि शरद पवार गटातील आजी-माजी लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. आज कमळ हाती घेतलेल्यांमध्ये ठाकरे गट शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी नगरसेवक रवी लांडगे, अमित गावडे, मीनल यादव. माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, माजी स्थायी समिती अध्यक्षा उषा वाघेरे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक समीर मासुळकर, जालिंदर शिंदे, प्रसाद शेट्टी, विनोद नढे. माजी स्थायी समिती अध्यक्ष नवनाथ जगताप, माजी अपक्ष नगरसेवक संजय काटे, कुशाग्र कदम यांचा समावेश आहे.
